ऑटोचालकाची प्रेमसंबंधातून हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नागपूर - लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत नातेवाइकांना बदनामीची भीती दाखवून विवाहितेला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शेजारी युवकाचा युवतीच्या भावाने साथीदारांच्या मदतीने भरचौकात चाकूने भोसकून खून केला. त्याच्या दोन साथीदारांवरही प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केले. हा रक्‍तरंजित थरार मंगळवारी रात्री अजनीतील कुंजीलालपेठमध्ये घडला. 

नागपूर - लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत नातेवाइकांना बदनामीची भीती दाखवून विवाहितेला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकणाऱ्या शेजारी युवकाचा युवतीच्या भावाने साथीदारांच्या मदतीने भरचौकात चाकूने भोसकून खून केला. त्याच्या दोन साथीदारांवरही प्राणघातक हल्ला करीत गंभीर जखमी केले. हा रक्‍तरंजित थरार मंगळवारी रात्री अजनीतील कुंजीलालपेठमध्ये घडला. 

कुंजीलालपेठ आंबेडकरनगरातील पंकज रवींद्र पाटील याचा यात मृत्यू झाला. मुलीचे वडील मनोहर सुखदेवे, भाऊ बंटी सुखदेवे, साथीदार नयन इमलकर, अमोल शेंडे व योगेश यांचा आरोपींत समावेश आहे. पोलिसांनी मनोहर सुखदेवे आणि नयन इमलकर यांना अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत. पंकज व आरोपी बंटी सुखदेवे हे एकाच वस्तीत राहतात.

पंकज हा ऑटो चालवितो, तर बंटी हा सावजी हॉटेलात काम करतो. वडील मनोहर सुखदेवे यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. पंकजचे बंटीच्या बहिणीसोबत दोन वर्षांपासून प्रेम होते. मात्र, बंटीच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी तिचे दुसरीकडे अमरावती येथील एका युवकासोबत लग्न लावून दिले. 

लग्नानंतरही पंकज हा तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. दरम्यान, मंगळवारी रात्री सुखदेवे यांच्या घरी कार्यक्रम होता. दरम्यान, पंकज दुचाकीने बंटीच्या घरासमोरून जात असताना त्यांच्यात वाद झाला आणि बंटीने आपल्या साथीदारासह पंकजसह त्याच्या मित्रांवर सशस्त्र हल्ला चढविला. पंकजवर शस्त्राने सपासप वार करून त्यास रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. यावेळी पंकजच्या मदतीला धावणारे स्वप्निल व पलाश यांनी समोरील भयावह चित्र बघून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपींनी पाठलाग करून पलाशच्या डोक्‍यावर सिमेंटच्या फरशीने वार केला. स्वप्निल हा जीव वाचविण्यासाठी एका इमारतीत घुसला. मात्र, आरोपी शोध घेत त्या घरातही घुसले असता स्वप्निल इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन पसार झाला. यावेळी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. आई माया रवींद्र पाटील (५२) यांनी पोलिसांना सूचना देऊन मुलाला घेऊन मेडिकल रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी पंकजला रात्री २ च्या सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

आनंदोत्सवावर विरजण
मंगळवारी सायंकाळी बंटीकडे बहिणीच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. घरासमोरच मोठा मंडपही टाकला होता. रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. तर रात्री १०.३० च्या सुमारास नामकरण कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचे जेवण सुरू होते. दरम्यान, पंकज हा मित्र स्टिफन सिंगच्या घराच्या छतावर स्वप्निल पाटील आणि पलाश वर्मा यांच्यासोबत दारू पीत बसला होता. नशेतच तो बंटीच्या घरासमोर शिवीगाळ करीत होता. पाहुण्यांसमोर होत असलेला अपमान सहन न झाल्याने बंटीने पंकजचा खात्मा केला. या हत्याकांडामुळे आनंदपर्वाच्या आनंदावर विरजण पडले.