मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक

नंदा जिचकार
नंदा जिचकार

मुलासह विदेशवारीवरून महापौरांविरोधात फलक
नागपूर : पदाचा गैरवापर करीत महापौरांनी मुलालाही विदेशात सैरसपाटा केला. यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली असून शहराची प्रतिमा डागळली, असा आरोप करीत कॉंग्रेस सदस्यांनी आज सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या राजीनाम्याची मागणी रेटून धरत गोंधळ घातल्याने सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरू असल्याने विषयांना मंजुरी देत महापौरांनी सभा स्थगित केली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महाल येथील नगरभवनात पार पडली. प्रश्‍नोत्तराचा तास संपुष्टात येत नाही, तोच विरोधी पक्षातील एका नगरसेविकेने सभागृहात महापौरांच्या मुलासह विदेशवारीवर व्यंग्य करणारे फलक आणल्याने गोंधळास सुरुवात झाली. अशाप्रकारचे फलक आणणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी बाकावरील ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केली तर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहातील महत्त्वाच्या विषयाची गांभीर्य नसल्याचा आरोप केला. महापौरांनीही कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होऊन महापौरांच्या आसनापुढे 'महापौर बदलो' अशी घोषणाबाजी केली. या गोंधळात सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधकांनी आणलेले फलक तोडले. त्यामुळे विरोधकांनी आणखी गोंधळ घातला. अखेर संदीप जोशी यांनी सभागृह दहा मिनिटांसाठी स्थगित करण्याची सूचना केली. महापौरांनी सभागृह स्थगित केले. दहा मिनिटांनी सभागृह सुरू झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच असल्याने महापौरांनी विषय पुकारत सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित केली.
सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधी बाकावरील नगरसेवकांनी आसनापुढे "महापौर बदलो' अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावर सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनीही "महापौर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणा बाजी केली. यावेळी सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आल्याने गोंधळात अधिकच भर पडली.

महापौरांच्या राजीनाम्यावरील विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर सत्तापक्षाची चर्चेची भूमिका होती. विरोधकांच्या आरोपांमध्ये सत्यता आणि तथ्य नव्हते. त्यांनाच चर्चा नको होती, म्हणून गोंधळ घातला. एकीकडे नारेबाजी करायची अन्‌ दुसरीकडे दुर्बल घटक समितीसाठी सदस्यांचे नाव पुढे करायचे, यातून विरोधकांचा दुटप्पीपणा पुढे आला.
-संदीप जोशी, सत्तापक्षनेते.


महापौरांचा विदेशी दौऱ्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतरही संधी मिळाल्यास पुन्हा मुलाला सोबत घेऊन जाईल असे महापौरांचे वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज चढल्याचे द्योतक आहे. सत्ताधाऱ्यांना स्थगन प्रस्तावावर चर्चाच होऊ द्यायची नव्हती. बहुमताच्या आधारावर कामकाज रेटण्यात आले. महापौरांचा हा कारभार हुकूमशाहीचा आहे.
-तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com