बाटलीबंद पाण्याची चारशे कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नागपूर - पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो, या गोष्टीवर काही वर्षांपूर्वी कुणी विश्वास ठेवला नसता; परंतु आता शुद्ध पाण्याची मागणी वाढल्याने बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय राज्यात फोफावला आहे. तसेच केवळ श्रीमंतांच्या हातात दिसणाऱ्या शुद्ध पाण्याच्या कॅन आणि बाटल्या आता गावखेड्यापर्यंत पोचल्या आहेत. राज्यात ८८८ लहान-मोठ्या कंपन्यांचे बाटलीबंद पाण्याचे पॅकेजिंग प्लांट आहेत. त्यातून दरवर्षी किमान चारशे कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

शहरातील विविध समारंभांत दिसणारे थंड पाण्याचे कुल केज, दोनशे मिलिलिटर ते दोन लिटरपर्यंतच्या पाण्याच्या बाटल्या तसेच पाउच आता ग्रामीण भागातील लहान मोठ्या दुकांनामध्ये दिसत आहेत. उन्हाळ्याची प्रखरता वाढल्याने हा व्यवसायही वाढला आहे. 

कुठे प्रतिष्ठा तर कुठे आरोग्यासाठी बाटलीबंद पाण्याची मागणी वाढतच आहे. केवळ विवाह सोहळ्यासाठीच नव्हे तर लहानमोठ्या कार्यक्रमांत, एवढेच नव्हे तर महाप्रसादाच्या कार्यक्रमातही शुद्ध व थंड पाण्याला वाढती मागणी आहे. लहान मोठ्या हॉटेलमध्ये आता ग्लासमधून पाणी देण्याऐवजी लहान बाटलीबंद पाणी दिले जाते. आधी केवळ उन्हाळ्यात चालणारा हा व्यवसाय आता बारा महिने सुरू आहे. दरवर्षी व्यवसायात २२ टक्‍क्‍यांनी वाढ होत आहे. 

शुद्ध पाण्याचा वापर ही बाब आता गरजेची झाली आहे. साधारणपणे एक हजार लोकांसाठी वीस लीटरचे १५ जार लागतात. विवाहासारख्या कार्यात काम करणारे मनुष्यबळ दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पंगतीऐवजी बुफेचा प्रकार वाढला आहे. उन्हाळ्यात तर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायिकांना श्वास घ्यायला फुरसत नसते. उन्हाळ्यात खास वाहनांमधून पाणी पोचविले जाते. फोनवरून मागणी केली की घरबसल्या पाण्याची व्यवस्था होते. 

बाटलीबंद पाण्याची विक्री विदर्भासह संपूर्ण राज्यात वाढतच आहे. आजच्या घडीला राज्यात ८८८ कंपन्या असून विदर्भात १०८ कंपन्या या व्यवसायात आहेत. सर्वाधिक ५१ कंपन्या नागपूर जिल्ह्यात आहेत. 
- अमिताभ मेश्राम, व्यवस्थापकीय संचालक, प्रोवेस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज 

पाण्याचा पसारा

८००० कोटी देशातील बाटलीबंद पाण्याची उलाढाल

३६००० कोटी २०२०पर्यंत अपेक्षित उलाढाल