भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण ठार; भाऊ गंभीर 

भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण ठार; भाऊ गंभीर 

नागपूर - भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत उड्डाणपुलाजवळ  बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. आशा जैन (60, रा. बिडीपेठ) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा येथे राहणारे दत्तात्रय गुलाबराव वराडे (46) यांच्याकडे कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे मोठी बहीण आशा जैन गेल्या होत्या. आज बुधवारी पाहुणचार झाल्यानंतर दोघेही बहीण-भाऊ नागपूरला दुचाकीने परत येत होते. मानकापूर उड्डाणपुलाजवळ त्यांची दुचाकी वळणावर असताना मागाहून भरधाव येणाऱ्या (पीबी 46/ एम 8907) ट्रकने त्यांना धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या आशा जैन या फेकल्या गेल्याने ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मरण पावल्या. या घटनेत दत्तात्रय वराडे हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर ट्रकचालक सुखदेवसिंग जगनाथसिंग (47, रा. पंजाब) याने पळ काढला. घटनेची माहिती मानकापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर ताबडतोब पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी दत्तात्रय वराडे यांना तातडीने मेडिकलमध्ये हलविले. त्यांची प्रकृती चिंतानजक असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी फरार ट्रकचालकाला सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

माणुसकीला काळिमा 
एक वृद्ध महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेली. रक्‍ताच्या थारोळ्यात महिलेचा भाऊ मदतीसाठी याचना करीत होता. मात्र, अनेक निष्ठुर मनाच्या बघ्यांनी मदतीसाठी हात पुढे केला नाही. उलट अनेक जण मोबाईलने चित्रीकरण करीत होते. तर काहींनी "फेसबुक लाइव्ह' या अपघाताची माहिती शेअर केली. मानकापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दी सारून जखमींना वैद्यकीय मदत पुरवली. या घटनेमुळे "सोशल मीडिया'ने पछाडलेल्यांची मानसिकता दिसून आली. 

वाहतूक पोलिसांवर रोष 
मानकापूर चौक "ऍक्‍सिडेंट स्पॉट' म्हणून ओळखला जातो. मात्र, वाहतूक पोलिस नेहमीप्रमाणे वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रामाणिक कर्तव्य सोडून रस्त्याच्या कोपऱ्यात घोळक्‍याने उभे असतात. दुचाकी चालकांना अडवून चिरीमिरी घेण्यासाठी सावज शोधत असतात. चौकातून मात्र अनेक जण सिग्नल जम्प करून सुसाट वाहने पळवितात. वाहतूक पोलिसांच्या अशा वर्तनामुळे चुकीचा संदेश समाजात जात आहे. 

कारच्या धडकेत वृद्ध ठार 
बाबारावजी भांडे (वय 80, रा. देवनगर) हे आज बुधवारी सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास पायी घरी जात होते. विवेकानंदनगरातून जात असताना एक कारचालक वाहन रिव्हर्स घेत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने वृद्धाला धडक बसली. या अपघातात बाबारावजी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी कारचालक नरेंद्र नारायण पुंडलकर (वय 55, रा. रामेश्‍वरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com