संमेलनस्थळाची घोषणा सप्टेंबरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महा-मंडळाच्या ९१ व्या संमेलनाच्या यजमानपदाची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. महामंडळ कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा होणार असून, तत्पूर्वी निवडक तीन स्थळांना भेटी देऊन समितीचा अहवाल तयार झालेला असेल.

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य महा-मंडळाच्या ९१ व्या संमेलनाच्या यजमानपदाची घोषणा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. महामंडळ कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा होणार असून, तत्पूर्वी निवडक तीन स्थळांना भेटी देऊन समितीचा अहवाल तयार झालेला असेल.

महामंडळाचे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, याबाबत साहित्य  वर्तुळात मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. विशेष म्हणजे यंदा यजमानपदाच्या शर्यतीत दिल्लीने उडी घेतल्याने निवड प्रक्रियेकडे अधिकच लक्ष वेधले गेले आहे. एकूण सहा प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. त्यापैकी बडोदा, दिल्ली आणि विदर्भातील बुलडाणा अशा तीन ठिकाणांवरून आलेल्या प्रस्तावांचा विचार महामंडळाच्या स्थळ निवड समितीने केला. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्‍यातील हिवराआश्रम या ग्रामपंचायतचा प्रस्ताव आहे. 

विशेष म्हणजे बुलडाणा प्रथमच या स्पर्धेत असल्याने स्थानिकांमध्ये अधिक उत्साह आहे. मात्र, दिल्लीतच संमेलन व्हावे, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे यावर्षी चर्चेत नसलेल्या मंडळींनीदेखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदाचा मान मिळविणे अनेक महत्त्वाकांक्षी साहित्यिकासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. त्यामुळे दिल्लीची घोषणा झालीच, तर ऐनवेळीसुद्धा काही दिग्गजांची नावे पुढे येऊ शकतात, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, मराठवाड्याचे प्रतिनिधी दिल्लीसाठी अनुकूल नसल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे कोणत्या स्थळाच्या बाजूने स्थळ निवड समितीतील सदस्यांची मेजॉरिटी असेल, याची उत्सुकता असेल. १८ व १९ ऑगस्टला बडोदा आणि दिल्ली, तर ९ सप्टेंबरला मेहकर येथील हिवराआश्रमला स्थळ निवड समिती भेट देणार आहे. १० सप्टेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. याच बैठकीत समितीचा अहवाल पुढे ठेवण्यात येईल आणि यजमानपदावर शिक्कामोर्तबही होईल. समितीमध्ये डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके आणि सुधाकर भाले यांच्यासह उज्ज्वला मेहंदळे, दादा  गोरे आणि प्रकाश पायगुडे आहेत.