‘१०८’ रुग्णवाहिकांच्या धर्तीवर हवी शववाहिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. गरीब रुग्णांना रेफर केल्यानंतर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्याची सोय राज्य शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत केली. राज्यात १०८ क्रमांकांची रुग्णवाहिका अर्थात जीवनवाहिनी सुरू केली. 

नागपूर - तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर रुग्णाला पहिल्या तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी. गरीब रुग्णांना रेफर केल्यानंतर नजीकच्या रुग्णालयात पोहोचवण्याची सोय राज्य शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत केली. राज्यात १०८ क्रमांकांची रुग्णवाहिका अर्थात जीवनवाहिनी सुरू केली. 

दोन वर्षांत राज्यात धावणाऱ्या जीवनवाहिनींच्या चाकांमुळे सहा लाख व्यक्तींचा जीव वाचवण्यात यश आले. मोफत उपचारासाठी मोफत रुग्णवाहिकेचा लाभ राज्य सरकाने उपलब्ध करून दिला. मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून देणाऱ्या शासनाने शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर दारिद्य्ररेषेखाली तसेच गरिबांना शववाहिका उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.  

उपराजधानीतील मेयो, मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांचा, तांड्यावरील पारध्यांचा किंवा नक्षलग्रस्त भागातील गरीब आदिवासीचा मृत्यू झाल्यानंतर खासगी शववाहिकाधारकांकडून शव पोहोचवून देताना गरिबांची प्रचंड लूट होत आहे. पैसे नसलेल्या गरीब आदिवासी, पारधी बांधवांना पैशाअभावी शवाचे नागपुरातच अंत्यसंस्कार उरकून घ्यावे लागते.

विशेष असे की, खासगी शववाहिकाद्वारे मेडिकल, मेयोच्या शवविच्छेदन विभागाच्या परिसरात किंवा मेडिकलच्या वॉर्डातून शव पोहोचवून देण्यासाठी दलाली सुरू होते. नुकतेच नागपुरात कंत्राटदाराकडे काम करताना संतोष नन्नावरे या पारधी बांधवांचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर संतोषचा मृतदेह वरोरा येथे पोहोचवण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागली. मोफत उपचार मिळत असताना शववाहिकेसाठी पाच ते सात हजार रुपये गरीब आणणार कुठून, हा सवाल गरीब मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.

चार शववाहिका उपलब्ध करून द्याव्यात
१०८ क्रमांकाच्या ४२ रुग्णवाहिका नागपूर जिल्ह्यात आहेत. रुग्णवाहिकेत अतिदक्षता विभागाप्रमाणे पल्स ऑक्‍सिमीटर, सर्पदंश झाला असेल, तर विषरोधक (अँटिव्हेनम), सलाईन अशा उपकरणांचा समावेश आहे. ईसीजी मॉनिटर, हृदयाची स्पंदने सुरू करण्यासाठी शॉक मशीन, व्हेंटिलेटर, व्हॉलोमेच्रिक पंप, प्राण वाचविणाऱ्या जीवनरक्षक औषधांचा समावेश आहे. चार प्रकारचे स्ट्रेचरही उपलब्ध असतात. शिवाय गर्भवती मातेला रुग्णालयाच्या वाटेतच प्रसूतीकळा आल्यास रुग्णवाहिकेतच प्रसूतीची सोय करता येते. प्रसूतिगृहातील सर्व सोयी-सुविधा १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत आहेत. मात्र, दुर्दैवाने गरिबांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र शववाहिकेतून लूट होते. यामुळे मेयो आणि मेडिकलमध्ये किमान चार शववाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सिव्हिल ह्यूमन राइट प्रोटेक्‍शन असोसिएशनतर्फे पुढे आली. खासगी रुग्णवाहिका असलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने मारुती व्हॅन, टाटा सुमो व मेटॅडोर वाहनांसह काही वातानुकूलित वाहने आहेत. आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या मेयो मेडिकलमध्ये शववाहिका नाही.