प्ले स्कूलच्या धर्तीवर अंगणवाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - सध्या पालकांचा कल जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळाऐवजी खासगी शाळांकडे अधिक आहे. पाल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पालक पैसे मोजून शिकविण्यास तयार होत आहे. हीच स्थिती अंगणवाड्याची आहे. प्ले स्कूल, नर्सरीमुळे अंगणवाड्या ओस पडायल्या लागल्या असताना आता त्यांना डिजिटल करून बच्चे कंपनीला पुन्हा याकडे आकर्षित करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला आहे.    

नागपूर - सध्या पालकांचा कल जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या शाळाऐवजी खासगी शाळांकडे अधिक आहे. पाल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पालक पैसे मोजून शिकविण्यास तयार होत आहे. हीच स्थिती अंगणवाड्याची आहे. प्ले स्कूल, नर्सरीमुळे अंगणवाड्या ओस पडायल्या लागल्या असताना आता त्यांना डिजिटल करून बच्चे कंपनीला पुन्हा याकडे आकर्षित करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने सोडला आहे.    

जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी डिजिटल संकल्पना राबविली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यास थोडीफार मदत झाली. त्याच धर्तीवर आता जिल्ह्यातील ३१७ अंगणवाड्या डिजिटल करण्याचा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे.

प्ले स्कूल, नर्सरीच्या तुलनेत अंगणवाड्यामध्ये सुविधा नसल्याने तिथेही गळती लागल्याचे चित्र आहे. अंगणवाडीच शाळेची पहिली पायरी असते. लहान बालकांवर शिक्षणाचे प्राथमिक संस्कार केले जातात. विविध खेळ, कथा, गोष्टीतून त्यांचे लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे अंगणवाड्यामध्ये नर्सरीच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प महिला बालकल्याण विभागाने सोडला आहे. इंग्रजीची तोंडओळख, संगणकीय शिक्षण, संगीताच्या माध्यमातून विविध कला प्रकार आदी कौशल्ये व सुविधा पुरवल्यास अंगणवाड्या इंग्रजी नर्सरीशी स्पर्धा करू शकतील, असे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.

अंगणवाड्या निर्मितीवर भर 
इंग्रजी नर्सरींशी स्पर्धा करण्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्‍यात आदर्श अंगणवाड्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ३१७ अंगणवाड्या डिजिटल होणार आहेत. जिल्ह्यात एकूण २,१७६ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी निम्म्याहून जास्त अंगणवाड्या नियमित आहेत. त्यातील काही अंगणवाड्यांचे बांधकाम २०१५ पासून सुरू झाले आहेत. काही अंगणवाड्या जागेअभावी समाजमंदिरात भरतात. शासनाने आता नर्सरींशी स्पर्धा करण्यासाठी आदर्श अंगणवाड्यांच्या निर्मितीवर भर दिला आहे.

या अंगणवाड्या होणार डिजिटल  
जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्‍यातील ३९, उमेरड ४०, भिवापूर, ३९, कळमेश्‍वर १८, सावनेर १७, कुही ३०, नागपूर ३७, नरखेड १०, कामठी १८, रामटेक ३७, काटोल १७, मौदा १५ अशा एकूण ३१७ अंगणवाड्या डिजिटल होणार आहेत. यामध्ये मुलांना खेळण्यासाठी अत्याधुनिक साहित्य, तज्ज्ञ प्रशिक्षक, खाऊच्या सुविधांसह अद्ययावत स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे यांनी सांगितले.