झाडीपट्टी रंगभूमीला जातीय राजकारणाचा फटका

झाडीपट्टी रंगभूमीला जातीय राजकारणाचा फटका

नागपूर - आसामच्या कोहिनूर थिएटरनंतर देशात दुसऱ्या स्थानावर असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीने जगाच्या पाठीवर नाव कमावले. विदर्भ व देशाला असंख्य दर्जेदार कलावंत दिले. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या रंगभूमीला जातीय व पक्षीय राजकारणाने ग्रासले आहे. त्याचा मोठा फटका या रंगभूमीला बसत असल्याचे दु:ख झाडीपट्टीचे प्रसिद्ध अभिनेते व गायक ‘जलसा’कार अनिरुद्ध वनकर यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्‍त केले. 

गेल्या दोन दशकांपासून झाडीपट्टी रंगभूमीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारून रसिकांच्या हृदयात स्थान मिळविणारे वनकर म्हणाले, पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी झाडीपट्टी रंगभूमी एकेकाळी नाट्यप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय होती. केवळ विदर्भातीलच नव्हे, संपूर्ण देशातील रसिक रात्रभर चालणाऱ्या दर्जेदार नाटकांचा आनंद घेण्यासाठी येथे येत असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रंगभूमीची लोकप्रियता व आकर्षण कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याला मुख्यत्वे जातीय राजकारण कारणीभूत आहे. जातीसोबतच विविध राजकीय पक्षांचाही हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे रंगभूमीबद्दल आस्था व प्रेम असलेल्या खऱ्याखुऱ्या कलावंतांना खूप फटका बसतो आहे. हे सगळं पाहून मन दु:खी व उदास होते. मात्र, त्याला आमचाही नाइलाज आहे. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, तरच खऱ्या अर्थाने झाडीपट्‌टी रंगभूमीचे जुने दिवस परत येतील. शिवाय झाडीपट्‌टी रंगभूमीने आधुनिकतेचीही कास धरण्याच्या आवश्‍यकतेवरही त्यांनी भर दिला आहे.

उच्चविद्याविभूषित अनिरुद्ध यांनी आंबेडकरी चळवळीवर आधारित ‘दी ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता’ व ‘ठलवा’सारख्या लोकप्रिय नाटकांचे देशभर प्रयोग सादर करून लोकप्रियता मिळविली आहे. शिवाय ‘प्रकाशबाबा आमटे’ या चित्रपट तसेच झी मराठीवरील ‘दी रिअल महाराष्ट्र’ या कार्यक्रमांच्या माध्यमातूनही त्यांनी आपली छाप सोडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com