ऑटो चालकांकडून प्रवाशांची लूट

ऑटो चालकांकडून प्रवाशांची लूट

हिंगणा - पोलिस पत्नीची बसमध्ये वाहकाने छेड काढल्याने संतप्त पोलिस पतीने वाहकाला जबर मारहाण केली. यानंतर धंतोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्टार बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची झळ रविवारी दुसऱ्या दिवशीही दिसून आली. हिंगणा मार्गावर स्टार बस नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. गणेशोत्सवाचा दहावा दिवस असल्याने भक्तांनाही याचा फटका बसला. या आंदोलनामुळे ऑटो चालकांनी मात्र प्रवाशांची लूट केली. 

रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने गणेशोत्सवादरम्यान हजारो प्रवासी स्टार बसने प्रवास करतात. सकाळपासून हिंगणा मार्गावरील धरमपेठ, शंकरनगर, अंबाझरी, सुभाषनगर, हिंगणा नाका, बालाजी नगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक, आयसी चौक, झोन चौक, वानाडोंगरी, महाजनवाडी, रायपूर, हिंगणा बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. हिंगणा एमआयडीसीतील उद्योग सुरू असल्याने कामगारांनाही याचा फटका बसला. बस बंद असल्याचा फायदा घेऊन हिंगणा ते बर्डीदरम्यान तब्बल ४० रुपये आकारून ऑटो चालकांनी प्रवाशांची लूट केली. यावर पोलिसांचेही नियंत्रण नव्हते. एकूणच रविवार वाहतुकीची कोंडी करणारा ठरला. 

खापरी डेपो व्यवस्थापक संशयाचा भोवऱ्यात?
वाहक अशोक वालूरकर यांना पोलिसाने प्रवाशांसमोर जबर मारहाण केली. तेव्हा खापरी डेपो व्यवस्थापक योगेश नवघरे उपस्थित होते. त्यांनी वाहकाकडून पैसे व तिकीट कापण्याची मशीन हिसकावून घेतली. दुसरा वाहक सोबत आणून त्याच्या जवळ दिल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी बुट्टीबोरीकडे रवाना केली. पोलिसांशी मध्यस्थी करून प्रकरणावर तोडगा काढला नाही. यामुळे कर्मचारी संघटनेने नवघरे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी स्टार बस कर्मचाऱ्यांनी केली. 

दबंगगिरी करणाऱ्या पोलिसाला अभय
 वाहकाला मारहाण करणारा पोलिस कर्मचारी धंतोली ठाण्यात कार्यरत आहे. स्टार बस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असताना पोलिस प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही. या प्रकरणी पोलिस उपायुक्त राकेश ओला यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे स्टार बस कर्मचारी जेवढे आंदोलनाला जबाबदार आहेत, तेवढेच पोलिससुद्धा आहेत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यार वाहकाला पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी करणे गरजेचे होते. प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या प्रवाशांना विचारणे गरजेचे होते. असे न करता परस्पर पोलिसच दबंगगिरी करीत आहेत. पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी अशा पोलिस कर्मचाऱ्यांना आवर घालावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी रेटली आहे.

चारही कंपन्यांचा करार रद्द करावा
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी चार कंपन्यांशी करार केला आहे. जेव्हापासून या कंपन्यांनी कारभार हाती घेतला, तेव्हापासून अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. या कंपन्यांमध्ये बस संचलन करण्याची क्षमता दिसून येत नाही. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने टाइम्स ट्रॅव्हल्स, हंसा ट्रॅव्हल्स, आर. के. ट्रॅव्हल्स व डिम्स या कंपन्यांसोबत केलेला करार रद्द करावा. महानगरपालिकेच्या परिवहन समितीने स्वतः कारभार चालवावा, अशी मागणी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे जिल्हा संघटक संतोष कान्हेरकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com