...हे तर नागपुरातही शक्‍य, उगाच मुंबईचा खर्च! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नागपूर - मुंबईत महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, यात प्रामुख्याने शहरातील पदाधिकारी व महापालिकेचे पदाधिकारीच मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी नागपूरकरांकडूनच मार्गदर्शन होते, तर त्यासाठी मुंबई कशाला? नागपुरातही ते शक्‍य होते, अशी खंत व्यक्त करीत प्रशिक्षण शिबिराबाबत कपाळावर आठ्या घातल्या.

नागपूर - मुंबईत महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, यात प्रामुख्याने शहरातील पदाधिकारी व महापालिकेचे पदाधिकारीच मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी नागपूरकरांकडूनच मार्गदर्शन होते, तर त्यासाठी मुंबई कशाला? नागपुरातही ते शक्‍य होते, अशी खंत व्यक्त करीत प्रशिक्षण शिबिराबाबत कपाळावर आठ्या घातल्या.

भाजपने नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसह जुन्या नगरसेवकांसाठीही मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले.  शनिवारी दुसरा दिवस होता. या प्रशिक्षण शिबिरासाठी नागपुरातून ४ स्वीकृत सदस्य, मनपा पदाधिकाऱ्यांसह १११ नगरसेवक मुंबईला गेलेत. मुंबईतील या प्रशिक्षण शिबिरात भाजपच्या शीर्ष नेत्यांसह अनेकांचे मार्गदर्शन नगरसेवकांना मिळत आहे. परंतु, यात नागपूरकर मार्गदर्शकांचीच गर्दी अधिक दिसून येत आहे. त्यामुळे प्रशिक्षण शिबिरात फारसे काही नावीन्य नसल्याचे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याशिवाय या प्रशिक्षण शिबिराच्या उद्‌घाटन सत्रात काल, शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार यांनी मार्गदर्शन केले. शहर भाजपचे महामंत्री भोजराज डुंबे यांनी भाजपचा इतिहास नगरसेवकांना सांगितला. आपला वैचारिक परिवार यावर माजी स्थायी समिती अध्यक्ष डॉ. रविंद्र भोयर यांनी भाषण केले. शनिवारी ‘नगरसेवक ः भूमिका व जबाबदारी’ यावर आमदार प्रा. अनिल सोले यांनी व्याख्यान दिले. घनकचरा व्यवस्थापनावर नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्लपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी टिप्स दिल्या. महापालिकेच्या कररचनेवर अविनाश ठाकरे, शहराचा २४ तास पाणीपुरवठ्यावर संजय बंगाले, महापालिकेच्या कायद्याबाबत सुनील अग्रवाल, शासकीय योजना व लोकसहभाग यावर प्रगती पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, तर उद्या ३० रोजी लोकप्रतिनिधी व्यक्तिमत्त्व विकासावर पल्लवी श्‍यामकुळे मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये नागपूरकरांचीच गर्दी अधिक असल्याने हे शिबिर नागपुरातही शक्‍य होते, त्यासाठी मुंबईत येण्याची खरंच गरज होती काय? असा सवाल काही नगरसेवक खासगी चर्चेत उपस्थित करीत आहेत. उगाच मुंबईचा खर्च अन्‌ प्रभागातील नागरिकांची ओरड या दुहेरी पेचात नगरसेवक सापडले असून, कधी एकदाचे नागपूर गाठतो, असे त्यांना झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले मार्गदर्शन 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही नगरसेवकांना जनहिताच्या कामांबाबत टिप्स देणार आहेत. नागपूरकर नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नवे नाहीत. पक्षाच्या विविध मेळाव्यांत या दोन्ही नेत्यांचे मार्गदर्शन नगरसेवकांना मिळत असते. त्यामुळे तीनदिवसीय शिबिराला अनेक नगरसेवक कंटाळल्याचे समजते.

Web Title: nagpur news bjp