पेट्रोल दरवाढीचा फटका भाजपला बसेल - रावसाहेब दानवे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर - गेल्या 10 दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ त्वरित नियंत्रणात न आल्यास भाजपला पुढील काळात फटका बसण्याची शक्‍यता असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काल नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

नागपूर - गेल्या 10 दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. ही दरवाढ त्वरित नियंत्रणात न आल्यास भाजपला पुढील काळात फटका बसण्याची शक्‍यता असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काल नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. दानवे यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आज केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून निश्‍चितपणे इंधनदरवाढीवर अंकुश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. परंतु, दरवाढीवर त्वरित नियंत्रण न आल्यास लोकांना त्रास सहन करावा लागेल व पुढील निवडणुकांमध्ये निश्‍चितपणे भाजपला फटका बसेल, अशी कबुली दानवे यांनी दिली. 

गोरखपूर व फुलपूर लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला तरी याचा राज्यातील पोटनिवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही. पालघर व भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकांमध्ये भाजपला निश्‍चितपणे विजय मिळेल, असा दावा करून ते म्हणाले, पालघरमध्ये वनगा कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी भाजपतर्फे मिळणार होती. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली होती. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांनी भाजपचा त्या भागात विस्तार करण्यात मोठी भूमिका बजावली. यामुळे श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सहानुभूती गमावली आहे. ते या निवडणुकीत पराभूत होतील, असा दावाही त्यांनी केला. 

समविचार पक्षाशी युती करण्यासाठी भाजप नेहमीच उत्सुक असतो, असे सांगून ते म्हणाले, शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, यासाठी आमचे नेते प्रयत्नशील आहेत. भाजपच्या सकारात्मक प्रतिक्रियेला सेनेने प्रतिसाद न दिल्यास भाजप स्वबळावर लढायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते. 

Web Title: nagpur news BJP will be hit by the petrol price hike says Raosaheb Danve