पोलिस पत्नीची बसमध्ये छेडखानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - ‘आपली बस’ने प्रवास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची बस वाहकाने छेडखानी केली. त्यामुळे महिलेने वाहकाच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर लगेच पोलिसांना बोलावले. छेड काढल्याचे कळताच पोलिसांनी बस वाहकाला चांगला चोप दिला. मात्र, त्यानंतर वाहकाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. बसवाहक संघटनेच्या सुमारे २०० ते ३०० वाहक-चालकांनी धंतोली पोलिस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे सुमारे तीन तास तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दुपारनंतर अचानक रस्त्यावरील आपली बस बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

नागपूर - ‘आपली बस’ने प्रवास करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची बस वाहकाने छेडखानी केली. त्यामुळे महिलेने वाहकाच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर लगेच पोलिसांना बोलावले. छेड काढल्याचे कळताच पोलिसांनी बस वाहकाला चांगला चोप दिला. मात्र, त्यानंतर वाहकाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. बसवाहक संघटनेच्या सुमारे २०० ते ३०० वाहक-चालकांनी धंतोली पोलिस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे सुमारे तीन तास तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे दुपारनंतर अचानक रस्त्यावरील आपली बस बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

अशोक लक्ष्मण वालूरकर (३७, रा. राजापेठ) असे वाहकाचे नाव आहे. पीडित २१ वर्षीय महिला ही शनिवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास सातगावला जाण्यासाठी पंचशील चौकातून बुटीबोरीला जाणाऱ्या बस (एमएच-३१, सीए-६०८४)मध्ये बसली. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्या वेळी पीडित महिलेला अचानक धक्का लागला. तिने मागे वळून बघितले तर बसचा वाहक तिला शेजारी उभा दिसला. प्रथम तिला गर्दीमुळे धक्का लागला असावा, असे वाटले. त्यामुळे तिने दुर्लक्ष केले. त्यानंतर तोच वाहक पुन्हा जाणीवपूर्वक शरीराला स्पर्श करीत असल्याचे दिसले. त्यामुळे तिने धंतोली पोलिस ठाण्यात कार्यरत आपल्या नवऱ्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिचा पती आपल्या एका पोलिस साथीदारासह रहाटे कॉलनी चौकात बसची वाट बघत होता. बस रहाटे कॉलनी चौकात पोहोचताच त्यांनी अशोकला सोबत चलण्यास सांगितले. मात्र, तो कारण विचारत होता. त्या वेळी पोलिसांनी त्याला कारण न सांगता मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या बसमध्ये आपली बसची एक महिला कर्मचारी बसलेली होती. तिने हा सर्व प्रकार बघितला. तिने इतर सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर स्टारबस संघटनेमध्ये वाहकाला पोलिसांकडून बेदम मारहाणीची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला व धंतोली पोलिस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा मेहंदळे यांनी या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अशोकला अटक केली.

वाहक निर्दोष असल्याचा दावा 
विनयभंगाच्या आरोपात अटक करण्यात आलेला वाहक निर्दोष असल्याचा दावा करीत शहर बसमधील सर्व वाहक व चालकांनी शनिवारी दुपारपासून संप पुकारला. आपली बसची चाके बंद झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. उशिरा रात्रीपर्यंतही संपावर तोडगा निघाला नसल्याने रविवारीही महापालिकेची शहर बससेवा कोलमडण्याची शक्‍यता बळावली आहे. बसमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले अशोक वालुरकर (४५) यांना धंतोली पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले आहे. या घटनेने शहर बस चालविणाऱ्या तिन्ही कंत्राटदार कंपन्यांमधील वाहक व चालकांनी धंतोली पोलिस ठाणे गाठून पोलिस गोपाल शिंदे यांच्याविरोधात कारवाई व वालुरकर यांना सोडण्याची मागणी करीत गोंधळ घातला. तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी दुपारपासूनच संप पुकारला. त्यामुळे शहर प्रवासी सेवा पूर्णतः कोलमडली. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे महापालिका परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी रात्री उशिरापर्यंत संपकर्त्या कर्मचाऱ्यांची संपर्क करीत संप मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वालुरकरवरील कारवाई मागे घेतल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका बस कर्मचाऱ्यांनी घेतली.

तोपर्यंत बससेवा बंद
बसमध्ये प्रचंड गर्दी होती. वाहकाच्या एका हातात तिकीट देण्याचे मशीन आणि दुसऱ्या खांद्यावर पैशाची पिशवी असते. त्यामुळे महिलेचा विनयभंग झाल्याची बनाव वाटतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे (स्टार बस कर्मचारी संघटना) सचिव अंबादास शेंडे आणि भाऊराव रेवतकर यांनी दिली. तसेच पोलिसांनी त्याला अटक करायचे होते, तर पूर्वी गुन्हा दाखल करायचा होता. मात्र, गुन्हा दाखल न करताच महिला पोलिस ठाण्यात पोहोचण्यापूर्वीच बसमधून वाहकाला उतरवून त्याला रस्त्यावर बेदम मारहाण करणे चुकीचे असून, संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि अशोकला जामीन मिळेपर्यंत स्टार बस कर्मचाऱ्याचा संप सुरूच राहील, असेही ते म्हणाले. अशोक वालूरकर यांच्या पत्नी जयश्री यांनी पतीवरील सर्व आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी पतीला बोलू दिले नाही. त्याला जबर मारहाण केल्याचे दिसते. पोलिस वारंवार वेगवेगळी माहिती देत आहेत, असा आरोप पोलिसांवर केला आहे.