शासकीय निवासस्थानात आढळली ३३० जिवंत काडतुसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - अजनी रेल्वेस्थानकासमोरील मेडिकल कॉलनीतील पडक्‍या क्‍वॉर्टर्सच्या गटाराजवळ ३३० जिवंत काडतुसे आणि १०१० बुलेट केस आढळले. मंगळवारी दुपारी धंतोली पोलिसांनी तीन तास शोधमोहीम राबविली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्म ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर - अजनी रेल्वेस्थानकासमोरील मेडिकल कॉलनीतील पडक्‍या क्‍वॉर्टर्सच्या गटाराजवळ ३३० जिवंत काडतुसे आणि १०१० बुलेट केस आढळले. मंगळवारी दुपारी धंतोली पोलिसांनी तीन तास शोधमोहीम राबविली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध आर्म ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मेडिकल कॉलनीतील घर क्रमांक सी २-५ मध्ये टू महाराष्ट्र मेडिकल कंपनीचे पोलिस हवालदार डी. के. श्रीवास्तव राहायचे. तीन महिन्यांपूर्वी त्यांची सिक्‍कीममध्ये बदली झाली. तेव्हापासून क्‍वॉर्टर बंद होते. क्‍वॉर्टरच्या शौचालयाजवळील नालीत जिवंत काडतुसे आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना ३३० काडतुसे आणि रिकामे केस आढळले. ही काडतुसे पॉइंट २२ बंदुकीची आहेत. 

झोन चारचे उपायुक्‍त एस. चैतन्य आणि एनसीसी विंगचे अधिकारी प्रदीपकुमार यादव यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबविण्यात आली. हवालदार श्रीवास्तव यांच्या घराचे कुलूप तोडून शोध घेतला असता घरातही काडतुसे सापडली. मोठ्या प्रमाणात काडतुसे शौचालयात टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. वॉर्डन हरीश सहारे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धंतोली पोलिसांनी एनसीसीचे कमांडिंग विंग ऑफिसर कर्नल हरेंद्र तिवारी, कामठी सेनादलाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. 

हवालदार डी. के. श्रीवास्तव यांनी बदलीनंतर नागपूर सोडण्यापूर्वी हजारीपहाड येथील कार्यालयात घराची किल्ली जमा करणे आवश्‍यक होते. परंतु, ते घराला कुलूप लावून निघून गेले. त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

मेडिकल कंपनी कार्यालयाचा अहवाल 
मेडिकल कॉलेजच्या वतीने टू महाराष्ट्र मेडिकल कंपनी एनसीसी प्रशिक्षण होत असते. श्रीवास्तह स्टोअर किपर पदावर कार्यरत होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे मिळाल्याने मेडिकल कंपनीतून अहवाल मागविण्यात आला. कामठीतील सेना कार्यालयाच्या वतीनेही हवालदार श्रीवास्तव यांची माहिती मागविण्यात आली आहे.

बीडीडीएस, श्‍वान पथकाला पाचारण
मोठ्या प्रमाणात बुलेट सापडत असल्याने येथे स्फोटके असू शकतात, असा संशय असल्याने पोलिसांनी बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण केले. तसेच डीप मेटल सर्च विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलाविले. या वेळी जिवंत बुलेट आणि अन्य स्फोटक सामग्रीचा शोध घेण्यात आला.