दसऱ्यापासून सीसीटीव्हीची ‘कैद’ 

रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - ‘स्मार्ट सिटी प्रोजेक्‍ट’अंतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येत्या महिनाभरात म्हणजेच दसऱ्याचा मुहूर्त साधून संपूर्ण नागपूर शहर सीसीटीव्हीच्या ‘कैदेत’ येणार आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे काम सुकर होणार आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही प्रोजेक्‍ट फायदेशीर ठरणार आहे. 

नागपूर - ‘स्मार्ट सिटी प्रोजेक्‍ट’अंतर्गत शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येत्या महिनाभरात म्हणजेच दसऱ्याचा मुहूर्त साधून संपूर्ण नागपूर शहर सीसीटीव्हीच्या ‘कैदेत’ येणार आहे. त्यामुळे पोलिस विभागाचे काम सुकर होणार आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही प्रोजेक्‍ट फायदेशीर ठरणार आहे. 

मेट्रो सिटी म्हणून नावारूपास आलेल्या नागपूर शहराला ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी मनपा आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहेत. ‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिळालेल्या २५२ कोटी रुपयांच्या निधीतून सीसीटीव्ही लावण्यासाठी खर्च करण्यात येत आहे. नाशिक येथील एका कंपनीला सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट दिले आहे. ‘हाय एच डी’ स्वरूपाचे कॅमेरे लावण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी नागपुरात सुरू झाले होते. सप्टेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण करून द्यायचे होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील कामाचा धडका लावला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सीसीटीव्ही लावण्याचे काम जवळपास ८० टक्‍के पूर्ण झाले आहे. शहरात चौकात आणि मुख्य रस्त्यांवर ४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्यापैकी जवळपास ३ हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. येत्या महिनाभरापूर्वीच शहरातील सीसीटीव्ही चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात  येतील. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे संच हे महागडे असून रात्रीसुद्धा स्पष्ट चित्र दिसणार आहे. यासोबतच कॅमेऱ्याची ‘झूम लेव्हल’सुद्धा चांगली असून जवळपास ४० फुटांवरील चित्र स्पष्ट दिसणार आहे. 

गुन्हेगारी थांबण्यास मदत
आज दिवसाढवळ्या चेनस्नॅचिंग, लूटमार, पाकीटमार, महिलांची छेडखानी किंवा युवतींवरील शेरेबाजी यासारखे गुन्हे नेहमी घडत असतात. प्रत्येक चौकात पोलिस कर्मचारी ठेवणे शक्‍य नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सीसीटीव्ही लागल्यानंतर या गुन्हेगारीला आळा बसेल. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांमध्येही दहशत निर्माण होईल.

अपघातग्रस्तांना त्वरित मदत
शहरात अनेक ठिकाणी अपघात होतात. मात्र, रस्त्याने जाणारे किंवा वाहनधारक अपघातग्रस्तांना मदत करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना मदतीअभावी जीव गमवावा लागतो. मात्र, सीसीटीव्हीमुळे अपघातग्रस्तांना पोलिस त्वरित मदत करतील. अपघातग्रस्तांचे प्राणही वाचविता येईल. शहरात वाहनांचे अपघातही टाळता येतील. 

मनपाची सीओसी ठेवणार ‘वॉच’
शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी जास्तीत जास्त कॅमेऱ्यांवर महापालिकेच्या सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी)ची नजर राहणार आहे. सीओसी केंद्र हे सिव्हिल लाइन्समधील मनपाच्या आठमजली इमारतीमधील सहाव्या मजल्यावर ट्रॅफिक ट्रॅक एजन्सीकडून तयार करण्यात येत आहे. मनपाच्या सीओसीमध्ये शहरातील कॅमेऱ्यांची ट्रायल घेण्यासाठी संगणक प्रणाली लावण्यात आली आहे. त्यापैकी काही संगणकावर ट्रायलसुद्धा घेण्यात येत आहेत. येथे कार्यरत एक्‍सपर्टस सॅटेलाइटच्या माध्यमातून शहरातील काही रस्त्यांवरील हालचाली टिपत आहेत.

पोलिस कर्मचाऱ्यांना लागेल शिस्त
वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी चौकात हजर राहत नाहीत. तैनातीच्या ठिकाणावरून थेट घरी जातात. काही महाभाग पोलिस कर्मचारी रस्त्यावरच चालानच्या नावावर वाहनचालकांची लूटमार करतात. वसुलीबाज कर्मचाऱ्यांमध्ये सीसीटीव्हीमुळे शिस्त येणार आहे. त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जाणार आहेत. शहरात बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले पोलिस कर्मचारी वेळेवर पोहचत नाहीत किंवा तैनातीवर जात नाहीत, याबाबतही गांभीर्य निर्माण होईल.

वाहतूक नियंत्रणासाठी सुकर
शहरातील जवळपास सर्वच चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी सोयीचे ठरणार आहे. वाहतूक पोलिस ई-चालान पाठविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करणार आहेत. यासोबतच शहरातील चौकाचौकांत सिग्नल जम्पिंग, राँग साइड, हेल्मेट, बाइक झुमिंग, झेब्रा क्रॉसिंग, स्टंटबाजी, रेसिंग-ओव्हरटेकिंग अशाप्रकारच्या वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

आधुनिक राहील कंट्रोल ॲण्ड कमांड रूम
पोलिस नियंत्रण कक्षासमोरील प्रस्तावित जागेवर एल ॲण्ड टी कंपनीला दुमजली कंट्रोल ॲण्ड कमांड रूम तयार करण्याचा ठेका देण्यात आला आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मोठमोठ्या स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये शहरातील सर्वच कॅमेऱ्यांचे चित्रीकरण दिसणार आहे. त्यासाठी मोठ्या सर्व्हरची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

शहराची सीमा वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे ही योजना राबविण्यासाठी पोलिस विभाग सक्षम आणि सज्ज आहे. त्यासाठी विशेष ट्रॅफिक कंट्रोल ॲण्ड कमांड रूम पोलिस नियंत्रण कक्षासमोर तयार करण्यात येत आहे. 
- डॉ. के. वेंकटेशम्‌, पोलिस आयुक्‍त