मध्य भारतात वर्षभरात १० वाघांचे बळी

मध्य भारतात वर्षभरात १० वाघांचे बळी

नागपूर - मध्य भारतात वर्षभरात वीजप्रवाहामुळे दहा वाघ आणि तीन बिबट्यांना जीव गमवावा लागला. २२ ऑक्‍टोबर  ते १४ ऑक्‍टोबर २०१७  या काळात सहा वाघ महाराष्ट्रात तर चार वाघ मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. तीन बिबटे मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. विदर्भातील मध्य चांदामधील धानापूर परिसरात ४ नोव्हेंबर २०१६ ला एक वाघ वीजप्रवाहाने मृत्युमुखी पडला. तर, या वर्षांच्या सुरुवातीला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सालेघाटजवळ एक वाघीण वीजप्रवाहाने मृत्युमुखी पडली. जयपासून झालेला श्रीनिवास हा वाघसुद्धा १९ एप्रिल २०१७ ला नागभीडजवळील कोथुळणा येथील शेतात वीजप्रवाहाने मारला गेला. जयच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी वीज प्रवाहामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होत असते. 

वन्यजीवांच्या शिकारीसाठी आतापर्यंत शिकारीच वीजप्रवाहाचा वापर करत होते. पण, आता याच वन्यजीवांपासून शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वीजप्रवाहाचा वापर करावा लागत आहे. यात वन्यप्राण्यांना मारणे हा त्यांचा हेतू नाही. पण, पीक वाचवताना वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. तृणभक्षी प्राणी आणि मग तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर असलेले वाघ, बिबट्या  वीजप्रवाहाचा बळी ठरतात. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील अवघ्या  दोन ते अडीच वर्षे वयाच्या मृत्युदंड ठोठावलेल्या वाघिणीचा मृत्यू अचानक वीजप्रवाहाने झाल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

वीजप्रवाहाने वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना संरक्षित क्षेत्र, वन्यजीवांचे संचार मार्गातच घडून येतात असे नाही, तर जंगलाला लागून असलेल्या क्षेत्रात आणि शेतातही या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. प्रामुख्याने वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या शेतांमध्ये हा प्रकार नेहमी घडतो. देशभरातच वीजवाहिन्या खुल्या आहेत. त्या वीजवाहिन्या भूमिगत करणे खर्चाला परवडणारे नाही. त्यामुळे अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही. 

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यालगतच्या शेतातील कुंपणावर वीजप्रवाह सोडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील शेतकरी नुकसान सहन करीत आहेत. 

सौरऊर्जेचा पर्याय उत्तम
वन्यप्राणी शेतातील पीक उद्‌ध्वस्त करीत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागते. त्या तुलनेत वनखात्याकडून मिळणारा मोबदला पुरेसा नसतो आणि तोदेखील वेळेवर मिळत नाही. म्हणून नाइलाजास्तव शेतकरी वीजप्रवाहाचा पर्याय वापरतात. त्यामुळे सौरऊर्जेचा प्रवाह कुंपणावर सोडणे हा उत्तम पर्याय आहे. पण, तो खर्चिक असल्याने त्यापासून लांब राहणेचे शेतकरी पसंत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com