कर्जमाफीसाठी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

कर्जमाफीसाठी शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

मूल (चंद्रपूर) - रोगाने पीक गेले. हातात काहीच पडणार नाही. कर्जाची रक्कम कशी फेडायची. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २३) सकाळच्या सुमारास तालुक्‍यातील गांगलवाडी येथे उघडकीस आली. परशुराम सखाराम बोलणवार (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्‍यातील गांगलवाडी येथे परशुराम सखाराम बोलणवार हे कुटुंबीयांसह राहत होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आलेवाही शेतशिवारातील दीड एकर शेतीतील उत्पन्नावर वृद्ध आई, पत्नी आणि तीन मुलांचा उदरनिर्वाह करीत होता. २००८ मध्ये शेतीसाठी वडिलांनी आठ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, कर्जाची रक्कम थकीत असल्याने ती आता व्याजासह १५ हजार रुपयांच्या घरात आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व शेती परशुराम बोलणवार करीत होते. थकीत कर्ज असल्यामुळे नवीन कर्ज त्याला मिळत नव्हते. त्यामुळे त्याने मशागतीसाठी बचगटाकडून २५ हजार रुपयांचे कर्ज होते. परंतु, भरघोस उत्पन्न हातात न आल्याने कर्जाच्या रकमेची परतफेड करू शकले नाही. 

या वर्षी पैशाची जुळवाजुळव करून मशागत केली. पीक चांगले आहे; परंतु  आता रोगामुळे पीक नष्ट झाले. उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत परशुराम बोलणवार होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले; परंतु रात्र होऊनही घरी परतले नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली; परंतु कुठेच पत्ता लागला नाही. आज सकाळच्या सुमारास वसंत चिचघरे यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा नागरिकांत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी खेडकर, तहसीलदार राजेश सरवदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

कर्जमाफीचा लाभ नाही 
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेचा लाभ मिळेल म्हणून परशुराम बोलणवार यांनी धावपळ केली. परंतु, अजूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नैराश्‍येपोटी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com