वनविभागात बनावट नियुक्तिपत्रांची वाळवी!

प्रमोद काकडे
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

चंद्रपूर - शासकीय नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून बेरोजगारांना लाखो  रुपयांनी फसविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे.  वनविभागातील भरतीचा संदर्भ देऊन वनरक्षकपदासाठी ही नियुक्ती केली जात आहे. वनाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच वनविभागात खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूर - शासकीय नोकरीचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून बेरोजगारांना लाखो  रुपयांनी फसविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे.  वनविभागातील भरतीचा संदर्भ देऊन वनरक्षकपदासाठी ही नियुक्ती केली जात आहे. वनाधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच वनविभागात खळबळ उडाली आहे. 

२०१५-२०१६ मध्ये वनविभागाच्या वतीने विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्‍त्यासुद्धा झाल्या आहेत. मात्र, ज्यांनी ही परीक्षा दिली होती, त्या उमेदवारांना आता नियुक्तिपत्र दिले जात आहे. याच्या मोबदल्यात मोठ्या रकमा उकळण्यात आल्याची माहिती आहे. वनविभागाचे बनावट नाव, बनावट सही-शिक्के आणि पदारूढ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर नियुक्तिपत्रांमध्ये करण्यात आला आहे.

 सरकारी नोकरीच्या लोभामुळे बेरोजगार याला बळीही पडत असल्याचे दिसून आले. यातील एक नियुक्तिपत्र ‘सकाळ’च्या हाती लागले. या पत्राची शहानिशा वनविभागातून केली असता, हे नियुक्तिपत्र तद्दन बोगस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या नियुक्तिपत्रात कार्यालयांची जी नावे लिहिली  आहेत, तशी कार्यालयेच अस्तित्वात नाहीत.

 शिवाय अधिकाऱ्यांचे पदही चुकीचे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यातील बनावटपणा लगेच पकडला. मात्र, ज्या अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर केला, त्यातील एक विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांच्या हा प्रकार  लक्षात आणून दिला असताना त्यांनाही याचा धक्का बसला. सोनकुसरे यांची स्वाक्षरी आणि नियुक्तिपत्रावरील स्वाक्षरी यात कुठलेही साम्य नव्हते. या प्रकरणाची आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सोनकुसरे यांनी सांगितले. 

२०१५-१६ मध्ये वनविभागाची लेखी परीक्षा  दिली, पण ज्यांची निवड होऊ शकली नाही, अशा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाच यात लक्ष्य करण्यात आले. आता ही प्रतीक्षा यादी या भामट्यांपर्यंत कुणी पोहोचवली, यात कुणी विभागातीलच व्यक्ती सहभागी आहे का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. हे काम करणारी टोळी असावी आणि ती राज्यभर कार्यरत असावी, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार आता वनविभाग पोलिसांकडे करणार आहे. 

बोगस नावे...
नियुक्तिपत्रावर उपवनसंरक्षक, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय असा उल्लेख आहे.  मात्र, अशा नावाचे कार्यालयच अस्तित्वात नाही. विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर हे कार्यालय चंद्रपुरात आहे. उपमुख्य वनसंरक्षक मध्य चांदा, असाही यात उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग, असे ते कार्यालय आहे. नियुक्तिपत्रातील या विसंगती बघता क्षणीच ते बोगस असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

Web Title: nagpur news chandrapur news Fake appointment letter in forest department