"त्यांच्या' अश्रूंची फुले होऊ द्या... 

"त्यांच्या' अश्रूंची फुले होऊ द्या... 

नागपूर - कोण, कुठले माहिती नाही. परंतु, चार दिवसांपूर्वी मेडिकलच्या वॉर्डात मृत्यू झाल्यानंतर संतोष नन्नावरे यांचे शव वरोरा येथील "चिनोरा पारधी टोला' येथे पोहोचवण्याचा सौदा खासगी शववाहिकांनी केला. त्यातून संतोषच्या आयुष्याची दुःखाने भरलेली कथा पुढे आली. चाळिशीतील संतोषच्या मृत्यूनंतर सात मुलींच्या जगण्याचा भार असह्य पत्नीच्या खांद्यावर आला. सात मुलींना जगविण्याचा, त्यांचे लग्न करण्याचा भार संतोषची पत्नी सुरेखा नन्नावरे यांना पेलवणे अशक्‍य आहे. नन्नावरे कुटुंबाचे अश्रू वाटून घेत या निराधार कुटुंबाला आधार देण्यासाठी समाजातील दानदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 

संतोष नन्नावरे मूळचे चिनोरा पारधी टोला येथील रहिवासी. वरोऱ्याचे रस्ते कंत्राटदार विनोद मणियार यांच्या शेतावर ते काम करायचे. मणियार यांच्या घरी दूध पोहोचविण्यापासून शेतातील सारी कामे ते करायचे. कुटुंबात कमावणारे ते एकटेच. पत्नीसह 10 जीव खाणारे. पोटचं पोटाले पुरत नाही, तर दवाई अडक्‍याले पैसा कुठून आणाचा... ही परिस्थिती संतोषच्या घरातील. अचानक त्या दिवशी संतोषचा अपघात झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. धर्मेंद्र शेरपुरे यांच्यासह काही मित्रांच्या मदतीने चंद्रपूर रुग्णालयात पोहोचवले. वर्गणी करून उपचार केले. चंद्रपूरच्या डॉक्‍टरांनी मेडिकलमध्ये पाठविले. मेडिकलमध्ये उपचार होतील, या आशेवर 108 ऍम्बुलन्सने उपचारासाठी आणले. परंतु, काळाने संतोषवर घाव घातला. संतोषच्या मदतीला कंत्राटदार मणियार धावून आला नाही. मृत्यूनंतर संतोषचा मृतदेह चिनोरा पारधी टोला येथे पोहोचवण्यासाठी मेडिकलमधील खासगी शववाहिका चालकांनी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा सौदा केला. नातेवाईक, मित्रांनी वर्गणी गोळा करून शववाहिकाचालकांचे बिल अदा केले. अंत्यसंस्कारातील चर्चेतून संतोषच्या मृत्यूनंतर सात मुलींना जगवण्याचा मोठा भार पत्नी सुरेखावर आल्याचे कळले. 

..."त्या' मातेच्या चेहऱ्यावर दुःख 
संतोष यांची मोठी मुलगी 15 तर सर्वांत लहान मुलगी अडीच वर्षांची आहे. या सात मुलींना जगवायचे, त्यांचे लग्न कसे करायचे, हा प्रश्‍न संतोष यांच्या पत्नीसमोर आहे. संतोष गेल्यापासून त्या मातेच्या डोळ्यांतील आसवांच्या धारा थांबत नाही. त्या मातेच्या चेहऱ्यावरची दुःखाची लकेर दूर करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. 

गरिबांच्या नशिबी कायम दुःखच असते. संतोष होता तेव्हा कसंबसं कुटुंब जगवत होता. परंतु, आता सात मुलींसह सुरेखाच्या जगण्यातील आनंद हरवला आहे. संतोष गेल्याचे दुःख हे कुटुंब पचवेल. होत असलेल्या वेदना पेलवतील; परंतु त्यांनी जगायचे कसे? त्यांना जगवण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा. सामाजिक संस्थांनी कुटुंबाला दत्तक घ्यावे. 
-धर्मेंद्र शेरपुरे, अध्यक्ष, चिनोरा पारधी टोला, वरोरा, चंद्रपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com