पदाधिकारी, नगरसेवकांचा असहकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नागपूर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणात शहराला मानाचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नातून महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी अंग काढल्याचे चित्र आहे. केवळ महापालिका अधिकारी शहराच्या सन्मानासाठी झटत आहेत. शहर स्वच्छ करणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी दुहेरी कसरत अधिकाऱ्यांना करावी लागत आहे.

नागपूर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणात शहराला मानाचे स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नातून महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनी अंग काढल्याचे चित्र आहे. केवळ महापालिका अधिकारी शहराच्या सन्मानासाठी झटत आहेत. शहर स्वच्छ करणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी दुहेरी कसरत अधिकाऱ्यांना करावी लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पर्धाच  सुरू केली. त्यामुळे शहरे स्वच्छ होऊन आरोग्याच्या समस्या टाळता याव्या, हा उदात्त हेतू पंतप्रधानांचा आहे. २०१७ मधील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर शहराचा क्र. १३७ वा होता. २०१८ मधील स्वच्छता सर्वेक्षणात स्वच्छ शहराच्या यादीत वरचा क्रमांक पटकावण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. यात प्रशासनातील, विशेषतः आरोग्य विभागातील अधिकारी सकाळ ते रात्रीपर्यंत राबत आहेत.

आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी स्वच्छ शहरासाठी ब्रॅण्ड ॲम्बेसिडर नियुक्त केले असून, त्यांच्यामार्फत स्वच्छ शहरासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, या ब्रॅण्ड ॲम्बेसिडरच्या मर्यादा असून, नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांमार्फत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येणे शक्‍य आहे. परंतु, एक नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

एवढेच नव्हे नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. कार्यकर्त्यांनी शहर स्वच्छ अभियानात योगदान दिल्यास स्वच्छता सर्वेक्षणात शहराचे मानांकन सुधारण्याची शक्‍यता आहे.  मात्र, सत्तेची फळे चाखताना पदाधिकाऱ्यांना  पंतप्रधानांच्या मोहिमेचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

महापौर नंदा जिचकार यांनी स्वच्छतेबाबत बैठकी घेतल्या. नागरिकांना स्वच्छतेसह ॲप  डाउनलोड करण्याचे आवाहनही केले. परंतु, शहरात महापौर किंवा प्रशासनातील मोजके अधिकाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडत असून नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रभागावरही लक्ष्य केंद्रित केल्यास स्वच्छतेच्या यादीत शहराची स्थिती सुधारण्याची शक्‍यता अधिकाऱ्याने व्यक्त केली. 

प्रभागामध्ये कचऱ्याचे साम्राज्य
प्रभाग १७ मधील इमामवाडा व इंदिरानगर वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे.  इमामवाड्यातील शौचालयाजवळ कचरा मोठ्या प्रमाणात असून, याबाबत नागरिकांनी नगरसेवक विजय चुटेले यांच्याकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केले. सर्वच प्रभागांमध्ये नगरसेवकाकडून स्वच्छतेबाबत अशीच भूमिका असून, यात सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची कसरत सुरू असून, २१७ वर्ग किमीमधील परिसरात लक्ष देणे शक्‍य होत नसल्याची खंतही अधिकाऱ्याने नमूद केली.

Web Title: nagpur news Clean India Campaign