प्रवेशाचा गोंधळात गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ कायम असून, संकेतस्थळाबद्दलच्या तांत्रिक अद्याप अडचणी कायम आहेत. कुणाला संकेतस्थळावर वेगळे तर एसएमएसवर वेगळेच कॉलेज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर संस्थास्तरावर करण्यात आलेल्या जागांच्या अलॉटमेंट यादीसाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत कॉलेजांनाही प्रतीक्षा करावी लागली. एवढे करूनही पहिल्या दिवशी प्रवेश मिळूनही तो विद्यार्थ्यांना निश्‍चित करता  आला नाही. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांचा प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे.

यंदा प्रथमच अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शहरात राबविण्यात येत आहे.  सहा जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया सुविधा केंद्रांपासूनच वादात राहिली आहे. कधी विद्यार्थ्यांची  पळवापळवी, तर कधी ऑनलाइन अडचणी अडथळा ठरल्या. प्रवेशासाठी नेमके कोणते कॉलेज मिळाले, या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत पहिली गुणवत्ता यादी प्राप्त झाली. यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील चाळीस हजारांहून विद्यार्थी पात्र ठरले. यातील ९५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विज्ञान व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला प्रथम पसंती दिली. पहिल्याच दिवशी येथील प्रवेश फुल्ल झाले  आहेत. असे असले तरी अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशप्रक्रियेबद्दल संभ्रम आहे.  दुसरीकडे पहिले तीन ऑप्शन दिल्यानंतरही वेगळेच महाविद्यालय अलॉट झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे विभागाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 

 ...तर विद्यार्थ्यांची शाखा होणार बाद
विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजला पहिला पसंतीक्रम दिला, त्याच कॉलेजमध्ये तो प्रवेशास पात्र ठरला आणि त्याने प्रवेश निश्‍चित केला नाही तर त्याची शाखा बाद होईल. दुसऱ्या फेरीसाठी ‘ऑप्शन फॉर्म’ भरताना त्याला तीच शाखा घेता येणार नाही. नियमानुसार त्याला शाखा बदलावी लागेल. तरच तो विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे  कॉलेज मिळाले तेथील प्रवेश टाळताना खबरदारी घ्यावी, असे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांत प्रवेश कसा?
संकेतस्थळावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता प्रवेशाचा मंगळवारचा दिवस पूर्ण व्यर्थ गेला. आता प्रवेशासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसांत प्रवेश कसा पूर्ण होणार? शिवाय विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. याद्यांमध्ये नियमितता नाही. फीस रिसीप्ट अपडेट नाही. त्यामुळे अडचणी येत असल्याचे काही महाविद्यालयांनी सांगितले.