महिलाराज येताच तक्रारी संपल्या!

महिलाराज येताच तक्रारी संपल्या!

नागपूर - चार महिला एकत्र येताच वादाला तोंड फुटते, असे विनोदाने बोलले जाते. खरेतर कोणतीही परिस्थिती योग्यरीत्या हाताळून समस्या मार्गी काढण्याचे कसब महिलांकडेच असते. हीच बाब अजनी स्थानकावरील महिलाराजच्या प्रयोगामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिलादिनाच्या पर्वावर अजनी रेल्वेस्थानकाचा संपूर्ण ताबा महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला तेव्हापासून दोन महिन्यांच्या काळात प्रवाशांकडून एकही तक्रार नोंदविली  गेली नाही.

संपूर्ण रेल्वेस्थानकच महिलांद्वारे संचालित करण्याचा धाडसी निर्णय मध्य रेल्वेचे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी घेतला. त्यानुसार महिला दिनापासून अजनी रेल्वेस्थानकावर अधिकारी ते कर्मचारी अशा सर्वच पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली. महिलांनी सामूहिकरीत्या आव्हान लीलया पेलले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी महिलेकडून ज्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडण्यात येत असल्याने अजनी स्थानकावरील महिलाराजचा प्रयोग यशस्वी ठरला. प्रवाशांनी कोणतही तक्रार करताच त्या तातडीने सोडविल्या जातात. यामुळे एकाही प्रवाशांला तक्रार पुस्तिकेचा उपयोगच करावा लागला नाही. 

महिलाराज आल्यापासून अजनी स्थानकावरील प्रवासी संख्या आणि उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या स्थानकाच्या उत्पन्नात मार्च महिन्यात तब्बल २५.६० टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

शिवाय स्वच्छतेवर विशेषत्वाने भर दिला जात आहे. त्याचे फलीत म्हणून यंदाचे स्वच्छता चषक अजनी स्थानकाने पटकावले. अजनी स्थानकाचा संपूर्ण गाडा महिलाच हाकत असल्याची माहिती सर्वदूर पसरल्याने अनेकजण केवळ इथली व्यवस्थाच बघण्यासाठी फलाट तिकीट काढून येतात. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकांना भेट देऊन  महिलांच्या सांघिक प्रयत्नांचे कौतुक केले.

आम्ही साऱ्याजणी
स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी संपूर्ण व्यवस्थेचे संचालन करीत आहेत. त्यांच्यासह वाणिज्य विभागाच्या मुख्य लिपिक कीर्ती अवसरे यांच्या नेतृत्वात सहा कर्मचारी, तिकीट तपासणी पथकाच्या माला हुमणे यांच्यासह तीन कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रभारी सुशीला अग्रवाल यांच्या नेतृत्वात १३ महिला आणि मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्यासह चार लगेच पार्सल पोर्टल स्थानकावर कार्यरत आहेत. आम्ही साऱ्याजणी मिळून स्थानकाचा कायापालट करू असा त्यांचा निर्धार आहे. 

प्रवासी आणि नागपूरकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे. भविष्यात अजनी रेल्वेस्थानक अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार व्हावे, असा आम्ही ठाम निश्‍चय केला आहे. त्यासाठी नियोजनही करण्यात आले असून लवकरच या स्थानकाचा कायापालट झालेला दिसून येईल. 
-माधुरी चौधरी,  रेल्वेस्टेशन व्यवस्थापक, अजनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com