‘पद्मावत’बाबत संभ्रमावस्था

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नागपूर - ‘पद्मावत’ चित्रपटाला देशभरातील विविध संघटनांकडून होत असलेला विरोध आणि सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला मिळत असलेल्या धमक्‍यांचा प्रभाव नागपूरच्या प्रदर्शनावर झाला आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे चार दिवस शिल्लक असताना अनिश्‍चिततेचे सावट पसरले आहे. 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट चित्रीकरणाच्या काळापासूनच वादात राहिला. दरम्यान, चित्रपटाच्या विरोधात निदर्शने व हिंसक घडामोडी घडल्यानंतर सेन्सॉरचे प्रमाणपत्र नाकारण्यात आले.

त्यानंतर बरेच बदल करून चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी दिग्दर्शकाने दाखविली. सुरुवातीला या चित्रपटाचे ‘पद्मावती’ असे नाव होते. मात्र, आता ते ‘पद्मावत’ असे करण्यात आले. नागपुरातही काही संघटनांचा या चित्रपटाला विरोध आहे. पण, विरोधाची तीव्रता फारशी निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागपुरात अतिशय शांततेत प्रदर्शन होईल, असा विश्‍वास साऱ्यांनाच होता.

मात्र, प्रत्यक्ष सिनेमागृहाचे व्यवस्थापन मात्र यासंदर्भात कुठलीही जोखीम पत्करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे चार दिवसांवर प्रदर्शन आले तरी कुठल्या सिनेमागृहांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित होईल, हे निश्‍चित झालेले नाही. ‘बुक माय शो’ या ॲपवर प्रदर्शनाचा दिवस २४ जानेवारी दाखविला जात आहे. 

मात्र, मुळात चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शिवाय या ॲपवर २४ जानेवारीला चार मल्टिप्लेक्‍स आणि २५ जानेवारीला एका मल्टिप्लेक्‍समध्ये ‘पद्मावत’चे शो होणार असल्याचे प्रथमदर्शनी आढळते. त्यानंतरच्या दिवसांचे बुकिंग मात्र देण्यात आलेले नाही. यासंदर्भात एका सिनेमागृहाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘सुरक्षेच्या कारणाने सारेकाही खोळंबले आहे. गुजरातच्या मल्टिप्लेक्‍स असोसिएशनने प्रदर्शनाबाबत हात वर केले आहेत. पोलिस प्रशासन सुरक्षेची हमी देत असेल, तर आम्ही प्रदर्शित करायला तयार आहोत. पण, तोडफोड झाली तर आमचे नुकसान होईल. आज मुंबईत प्रदर्शनासंदर्भात बैठक सुरू आहे.  आज किंवा उद्या दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.’ नागपुरात किमान दहा सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाला मोठी काळजी घ्यावी लागेल, हेही तेवढेच खरे.

Web Title: nagpur news confussion to padmaavat movie