'देशाच्या एकात्मतेला धोका'

'देशाच्या एकात्मतेला धोका'

नागपूर - देशात जाती व धर्माच्या नावावर फाळणीचा प्रयत्न सुरू आहे. सद्य:स्थितीत देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे लोकशाही धोक्‍यात आहे. हे सरकार गरिबांविरोधातील असून, मूठभर लोकांसाठी काम करीत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. देशाचा इतिहास बदलण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. मात्र, हाफपॅंटवरून फुलपॅंटवर आलेल्यांना इंदिराजींच्या स्मृती लोकांच्या मनातून पुसता येणार नाही, असे नमूद करीत त्यांनी संघावरही हल्ला चढविला.   

शहर काँग्रेस कमिटीतर्फे सिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटरच्या मैदानावर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा पार पडला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सैनिक लीलाताई चितळे होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ संपादक, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राजस्थान येथील माजी आमदार विमराज भाटी, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी शहराध्यक्ष शेख हुसेन, प्रा. बबनराव तायवाडे, ॲड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, अतुल कोटेचा, माजी महापौर नरेश गावंडे, सेवादलचे रामगोविंद खोब्रागडे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रज्ञा बळवाईक यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी या सरकारविरोधात ‘चले जाओ’चा नारा देण्यासाठी पक्षातील सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करीत चव्हाण म्हणाले की,  इंदिराजींनी देशातील गरिबी हटविण्यासाठी वीस कलमी कार्यक्रम तयार केला. सरकारच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेस आढावा घेत होती. परंतु, आज सारे निमूटपणे बघ्याची भूमिका घेत आहेत. या सरकारने काळा पैसा आणण्याच्या नावावर काही मूठभर लोकांचा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांच्यामुळे गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालील वाळू सरकल्याचा टोलाही त्यांनी हाणला. आणीबाणीनंतरच्या काळात काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहिली. तीच पुनरावृत्ती येत्या २०१९ मध्ये करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी या वेळी उपस्थित काँग्रेसजनांनाही दिला. 

गांधींचा मार्ग हवा की गोडसेचा - प्रा. द्वादशीवर 
नागपूर, विदर्भातून दोन मार्ग जातात. एक मार्ग महात्मा गांधींचा असून दुसरा मार्ग गोडसेचा आहे. देशाची स्थिती भयानक असून कुठल्या मार्गाने जायचे, हे नागपुरातच ठरविण्याची गरज ज्येष्ठ संपादक, साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीमध्ये पोलिस अटक करून घेऊन जात होते. ती कायदेशीर आणीबाणी होती. देशात सध्या दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांची गोळ्या घालून टोळक्‍याने हत्या केली. आता टोळक्‍यांची अघोषित आणीबाणी सुरू असल्याची टीका त्यांनी केली. इंदिरा गांधी यांनी केवळ देश सांभाळला नाही, तर खलिस्तान चळवळ नष्ट करून देशाची दुसरी फाळणी टाळली व देश अखंड ठेवला, असे नमूद करीत इंदिरा गांधी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com