काँग्रेस ‘बंडोबा’ नगरसेवकांची दिल्ली वारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर - पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने महापालिकेतील काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांनी दिल्ली गाठली आहे. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ही वारी असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर - पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने महापालिकेतील काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांनी दिल्ली गाठली आहे. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ही वारी असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार नागपूर शहर काँग्रेस समितीने नागपूर  महापालिकेतील १६ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांच्या विरोधात बंडखोरी करून तानाजी वनवे यांनी वेगळा गट स्थापन करून  विरोधी पक्षनेतेपद पटकाविले. तानाजी वनवे यांच्यासोबत असणाऱ्या ६ नगरसेवकांवर शहर काँग्रेसने निलंबनासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसचे एकाही बंडखोर नगरसेवकाने उत्तर दिले नाही. याउलट पक्षश्रेष्ठीकडून दबाव आणून ही कारवाई रद्दबातल करण्याचे प्रयत्न चालविले आहे. यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक  प्रफुल्ल गुडधे दिल्लीला गेले आहेत. ते पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची  भेट घेणार आहेत. तानाजी वनवे यांना सोमवारी भेटीची वेळ दिलेली आहे. 

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या एककल्ली कारभारामुळे नागपूर शहरात काँग्रेसचा जनाधार ढासळत असल्याचे पक्षश्रेष्ठीच्या निदर्शनास आणून देणार आहेत. नगरसेवकाच्या निवडणुकीत जे लोक पराभूत झाले, त्यांना मोक्‍याच्या पदावर ठेवू नये. यामुळे पक्षाच्या संघटनेवर परिणाम होत असल्याचे सांगितले जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर याच गटाच्या कार्यकर्त्याने शाई फेकली होती. हा कार्यकर्ता चतुर्वेदी गटाचा होता. या मुद्यावर बंडखोर गटाचे नेते अडचणीत सापडले आहेत. संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असा पवित्रा या बंडखोर गटाने घेतला आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील बंडखोरीवर उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.