काँग्रेसच्या मेळाव्याकडे बंडखोरांचे लक्ष

काँग्रेसच्या मेळाव्याकडे बंडखोरांचे लक्ष

नागपूर - इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोहाच्या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार असल्याने शहरातील बंडखोर चांगलेच धास्तावले आहेत. ते आपल्या भाषणातून कोणाला इशारा देतात आणि काय संकेत देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शहरातील काँग्रेसमधील बंडखोरी चांगलीच टोकाला गेली आहे. मुत्तेमवार विरुद्ध सतीश चतुर्वेदी- नितीन राऊत गट अशी उभी फूट पडली आहे. एकमेकांना आव्हान दिले जात आहे. प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या महापालिकेतील गटनेतासुद्धा बदलला. काँग्रेसच्या जनआक्रोश मेळाव्याच्याच दिवशी चंद्रपूर येथे इंदिरा गांधी जयंतीचा कार्यक्रम घेऊन शक्तीप्रदर्शन केले. एवढेच नव्हे तर दिल्लीला जाऊन प्रदेशाध्यक्षांच्या विरोधातही शड्डू ठोकला होता. दोन्ही गटातर्फे एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या जात आहे. मात्र, कोणावरही कारवाई केली जात नसल्याने निष्ठावंत अस्वस्थ आहेत. काय ते एकदाचे करा आणि काँग्रेसला वाचवा असे कार्यकर्ते बोलत आहे. बड्या नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. महापालिका हातची गेली. त्यापूर्वी विधानसभेत पक्षाचे पानिपत झाले. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर शहरातून काँग्रेस नामशेष होईल, अशी भीती व्यक्त केली  आहे. 

आज रविवारी बंडखोरांनी शांतिनगर येथील मुदलीयार सभागृहात इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोहाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, यादवराव देवगडे, माजी मंत्री अनिस अहमद, अशोक धवड, प्रफुल गुडधे, नितीन कुंभलकर, कृष्णकुमार पांडे, प्रज्ञा बडवाईक आदी उपस्थित राहणार आहेत. शहर काँग्रेसच्या कार्यक्रमात माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास  ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com