काँग्रेसमुळे भांडारकरांची ‘भागमभाग’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

‘मला अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही का?’
सलग दोन शहरांमध्ये पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी काँग्रेसविरुद्ध असलेला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला. नागपुरात झालेल्या प्रकारानंतर केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधींना टॅग करत ‘देशात मला अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही का? तसेच काँग्रेसच्या गुंडगिरीला आपले समर्थन आहे का? असा प्रश्‍न विचारला आहे.

नागपूर - पुण्यापाठोपाठ नागपुरातही दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या वादग्रस्त चित्रपटाला काँग्रेसतर्फे रविवारी (ता. १६) विरोध करण्यात आला. काँग्रेसने केलेल्या तीव्र विरोधामुळे भांडारकर यांनी संपूर्ण दिवसभर भागमभाग करून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि भांडारकर यांच्यामध्ये दिवसभर सुरू राहिलेला लपंडाव चर्चा आणि विनोदाचादेखील विषय बनला आहे.  

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लागलेल्या आणीबाणीवर टीका करणारा हा  चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. पुण्यात शनिवारी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनला विरोध केला. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह चित्रपटातील काही कलावंतांना पत्रकार परिषदस्थळी कोंडून ठेवले होते. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषद आयोजिण्यात आली होती. हॉटेल पोर्ट ओ गोमेज येथे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव केला. यामुळे भांडारकर हे पत्रकार परिषदस्थळी आलेच नाही. दरम्यान, भांडारकर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे असल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, भांडारकर वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉइंट गेल्याचे कळाले. तिथे विचारणा केली असता भांडारकर यांच्या नावाने चार खोल्या बूक असून ते तिथे आलेच नसल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. 

यानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भांडारकरांचा पिच्छा सोडला नाही. त्यांना गाठून काळे  फासण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळ गाठले. परंतु, भांडारकर ‘चेक ईन’ करून ‘व्हीआयपी लाऊंज’मध्ये बसले होते. तिथे प्रवाशांशिवाय इतरांना प्रवेश नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा झाली. या वेळी शहराध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, संजय महाकाळकर, प्रशांत धवड यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

‘संघ, भाजपचे षड्‌यंत्र’
आणीबाणीच्या काळात संघावर लादण्यात आलेल्या बंदीसारख्या विषयावर टिप्पणी करण्यात  आली आहे. तसेच आणीबाणीच्या काळात इंदिराजींनी घेतलेल्या काही निर्णयांना चुकीचे दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे. हा चित्रपट संघ आणि भाजपचे षड्‌यंत्र असून भांडारकर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा चित्रपट दाखवायला हवा. चित्रपटात काही आक्षेपार्ह नसेल तर काँग्रेसचा त्याला विरोध राहणार नाही. मात्र, तसे न करता भांडारकर यांनी दाखविलेला पळपुटेपणा त्यांच्या प्रामाणिकतेवर संशय निर्माण करणारा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच चित्रपट ज्या टॉकीजमध्ये प्रदर्शित होईल त्या टॉकीजची खैर नाही, असा इशारादेखील दिला. 

पोलिसांनी दिली धमकी
चित्रपटाविरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्ते हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट येथे चहा घेण्यास गेले. त्यावेळी पोलिसांनी ‘डिटेन’ करण्याची धमकी दिली. पोलिसांच्या या कृतीचा शहर काँग्रेसने विरोध केला आहे. पोलिसांची भूमिका जनरल डायरप्रमाणे असल्याची टीकादेखील काँग्रेसने केली.