नगरसेवकांशी पंगा एसएनडीएलला पडणार महाग

नगरसेवकांशी पंगा एसएनडीएलला पडणार महाग

नागपूर - थकबाकीदार भाजप नगरसेवकांची नावे उघड करणाऱ्या एसएनडीएलला महावितरणने मोठा झटका दिला असून, थकबाकी जमा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. भाजप नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे एसएनडीएलच्या चांगलेच महागडे ठरणार असल्याची चर्चा ‘नोटीस बॉम्ब’नंतर चांगलीच रंगली आहे. 

वीजबिल थकीत असलेल्या नगरसेवकांची यादी अलीकडेच उघड झाली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने पदाधिकाऱ्यांचा तिळपापड झाला. १५ नोव्हेंबरला महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात एसएनडीएलच्या वर्धमाननगर येथील कार्यालयावर धडक देत तोडफोड करण्यात आली. या प्रकरणात एसएनडीएलकडून थेट भाजप पदाधिकाऱ्यांच्या नावांसह गुन्हा दाखल करण्यात आला. वरकरणी प्रकरण शांत झाल्याचे भासत असले तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यातच आज महावितरणकडून ९० कोटींच्या थकबाकीसाठी एसएनडीएलला नोटीस बजावण्यात आली. लवकरात लवकर थकबाकी भरण्याची ताकीद एसएनडीएलला देण्यात आली आहे. मंगळवारी पाठविण्यात आलेल्या नोटीशीवर १८ नोव्हेंबर ही तारीख नमूद आहे. एसएनडीएलच्या थकबाकीने यापूर्वी दीडशे कोटींचाही पल्ला  गाठला आहे. शिवाय सुरक्षा ठेवीच्या स्वरूपात एसएनडीएलचे ७५ कोटी महावितरणकडे जमा आहेत.

स्थानिक भाजप पदाधिकारी आणि एसएनलीएलदरम्यान सुरू असलेल्या शीतयुद्धातून तसेच राजकीय दबावामुळे ही नोटीस बजावण्यात आली असण्याची शक्‍यता वीज क्षेत्राशी संबंधितांकडून व्यक्त केल्या जात आहे. एसएनडीएल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला, मात्र या विषयावर अधिक बोलणे टाळण्यात आले. 

समितीचा अहवाल काय म्हणतो...
विशेष म्हणजे एनएसडीएलच्या विरोधातील वाढत्या तक्रारींमुळे एक सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अहवालसुद्धा महावितरणला सादर केला आहे. त्यानुसार एसएनडीएलने सुविधा सुधारावी आणि अनियमितता दूर करावी असे म्हटले आहे. याशिवाय एनएनडीएलने थकबाकी नियमित द्यावी, असेही समितीने सूचित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com