अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीला पोटगी नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपूर - परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीला पोटगी देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. सीआरपीसीमधील कलम १२५ (४) मधील तरतुदीनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.

नागपूर - परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीला पोटगी देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. सीआरपीसीमधील कलम १२५ (४) मधील तरतुदीनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला.

या प्रकरणातील दाम्पत्याचे ९ मे १९९३ रोजी लग्न झाले. त्यांना मुलगा व मुलगी आहे. नवरा बाहेरगावी गेला किंवा घरी नसला की पत्नी प्रियकरासोबत संबंध प्रस्थापित करायची. एकदा मुलाने त्यांना नको त्या अवस्थेत पाहिले. ही बाब त्याने वडिलांना सांगितली. यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचे. यानंतर पत्नी स्वत:हून २८ नोव्हेंबर २००९ रोजी घर सोडून गेली. तसेच भंडारा सत्र न्यायालयात पोटगीसाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने पत्नीला तीन हजार रुपये महिना  पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला होता. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.

पत्नीने केलेल्या दाव्यानुसार पती तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. याला प्रत्युत्तर देत पतीने पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचे पुरावे सादर केले. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. याप्रकरणी पतीतर्फे ॲड. संकेत चरपे यांनी बाजू मांडली. 

सीआरपीसीचा दाखला
सीआरपीसीमधील कलम १२५ मध्ये पती-पत्नीची देखभाल करीत नसेल, तिला नांदवायला तयार नसेल, पत्नी कमवती नसल्यास तिला आर्थिकदृष्ट्या मदत म्हणून पोटगी देण्याची तरतूद आहे. मात्र, याच उपकलम (४) नुसार पत्नी जर परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत असेल, स्वत:हून विभक्त होऊन स्वतंत्र राहत असेल, तर तिला पोटगी देण्यात येऊ नये, अशी स्पष्ट तरतूद आहे. याचा दाखला देत न्यायालयाने पतीपासून विभक्त झालेल्या पत्नीला पोटगी देण्यास नकार दिला.