एकीशी घरोबा अन्‌ दुसरीशी साखरपुडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - खासगी कंपनीतील अभियंता अमरदीप देवाजी मेश्राम (२८, रा. कन्नमवारनगर, वर्धा रोड) याने विवाह नोंदणी संकेतस्थळावरून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नासाठी आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीची निवड केली. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून अभियंत्याविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अमरदीप हा मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील रहिवासी आहे. तो नागपुरातील मिहानमधील कंपनीत अभियंता आहे. तो चार वर्षांपासून नागपुरात राहतो. लग्न जुळत नसल्यामुळे त्याने विवाह नोंदणी संकेतस्थळावर माहिती दिली. त्याच संकेतस्थळावर पीडित २५ वर्षीय युवतीचे प्रोफाइल होते. दोघांची वेबसाइटवर ओळख झाली आणि एकमेकांचे मोबाईल क्रमांक मिळवले. फोनवरून मैत्री केली आणि भेटीगाठी सुरू झाल्या. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही एक वर्षापासून पती-पत्नीप्रमाणे राहू लागले.

अमरदीपबाबत तिने नातेवाइकांना माहिती दिली. लग्न होणार असल्यामुळे तो तिच्या घरात जावयाप्रमाणे वावरत होता. अमरदीपच्या आई-वडिलांनी नात्यातील युवती पसंत केली. त्याला चंद्रपूरला बोलावून बोलणे केले. गुपचूप साखरपुड्याचा दिवस ठरवला. यानंतर नागपुरात येऊन प्रेयसीला सांगितले आणि विसरून जाण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. अमरदीपच्या साखरपुड्याचा दिवस आला. ती साखरपुड्याच्या कार्यक्रमात पोहोचली. अमरने मैत्री कायम ठेवण्याचे आश्‍वासन देऊन तिची समजूत घालून लग्नात राडा न करण्याचा सल्ला दिला. आठ दिवसानंतर तो नागपूरला परतला. मात्र, तो तिला टाळू लागला.