चारही आरोपींना सोमवारपर्यंत कोठडी

चारही आरोपींना सोमवारपर्यंत कोठडी

नागपूर - चलनातून बाद झालेल्या कोट्यवधींच्या नोटा बदली प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. अहमदनगर आणि मुंबईवरून अटक केलेल्या चौघांना आज न्यायालयात उपस्थित केले. आरोपींना सोमवारपर्यंत (ता. १४) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अमित कांगणे (वय ३२, रा. कल्याण, मुंबई), नागेश कुसकर (वय ३०, रा. डोबिवली), नितीन नागरे (वय ३७, कल्याण, मुंबई) आणि सचिन शिंदे (संगमनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एकूण आरोपींची संख्या एकूण पाच झाली असून, नागपुरातील मद्यविक्रेता प्रसन्ना पारधी याला १ ऑगस्टलाच अटक करण्यात आली होती. नोटाबदली प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही.

गेल्या एक ऑगस्टला सायंकाळी पोलिस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी वॉक्‍स कुलर चौकातील राणा इमारतीत सुरू असलेल्या नोटाबदली डीलिंगवर छापा घातला होता. यात प्रसन्ना पारधीला अटक केली, तर एक कोटींच्या चलनातून बाद नोटा जप्त केल्या. 

प्रसन्नाकडून गुन्हे शाखेला मोठी लिंक मिळाली असून, पहिल्या टप्प्यात मुंबई आणि नगरच्या चौघांना पोलिसांनी अटक केली. हे आरोपी कामठी रोडवरील दुवा कंटिनेंटल हॉटेलमध्ये थांबले होते. रूम क्र. ३०१ मध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांची डिल झाली. तेव्हा अटक झालेल्या पाच जणांसह आणखी दोन आरोपी तेथे उपस्थित होते. मात्र, ते दोन्ही आरोपी पोलिसांच्या नेटवर्कच्या बाहेर आहेत. अटक आरोपींकडून संपूर्ण राज्यातील नोटाबदली करणाऱ्या टोळीचा मोठा खुलासा होऊ शकतो. 

बॅंक अधिकाऱ्यांची भूमिका काय?
आतापर्यंत आरबीआयमधील काही अधिकाऱ्यांचे नाव नोटा डीलिंग प्रकरणात समोर येत होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बॅंक अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे गुन्हे शाखेचे दुर्लक्ष होत आहे. लिंकमध्ये बॅंक अधिकाऱ्यांचे नावे समोर आल्यानंतरही आतापर्यंत गुन्हे शाखेने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

कोण आहेत हे आरोपी?
अमित कांगणे हा मुंबई-कल्याणमधील सर्वांत मोठा व्यावसायिक आहे. तो मेड इन चायना इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या वस्तूंचा व्यापारी आहे. यासोबच त्याचे एक पब्लिकेशनही आहे. दुसरा आरोपी नितीन नागरे हा त्याचा कारचालक आहे. मात्र, त्याच्या नावाने तो कोट्यवधींचे व्यवहार करतो. नागेश कुसकर हा डोंबिवली येथील निबंधक कार्यालयात दलाल म्हणून कार्यरत आहे. चौथा आरोपी सचिन शिंदे हा शेतकरी आहे. त्याची संगमनेर येथे काही हेक्‍टर जमीन आहे. यांची एकमेकांशी कशी ओळख झाली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com