पतंगबाजीतून हाणामारी

पतंगबाजीतून हाणामारी

नागपूर - मकरसंक्रांतीच्या आनंदोत्सवात अनेकांनी घराच्या छतावरून तर काहींनी मोकळ्या मैदानातून पतंगबाजीचा आनंद लुटला. मात्र, काही ठिकाणी आनंद साजरा करण्याच्या नादात चार ठिकाणी हाणामारी झाली. या प्रकरणी अजनी, यशोधरानगर आणि नंदनवनमध्ये पतंगबाजीवरून हाणामारी झाल्याने पोलिसांनी डझनभर युवकांवर गुन्हे दाखल केले.

यशोधरानगरातील पहिल्या घटनेत, भांडण सोडवून दोन्ही गटांतील मंडळींची समजूत घालणाऱ्यांवर एका गटातील युवकांनी प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात महेंद्र रविशंकर सेन (रा. बिनाकी ले-आउट) हे जखमी झाले. रविवारला बिनाकी मंगळवारी परिसरात काही युवक पतंग उडवत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास पतंगबाजीतून दुसऱ्या गटातील तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. त्यामुळे तेथे हाणामारी सुरू झाली. महेंद्र सेन यांनी मित्रांसह भांडण करणाऱ्या दोन्ही गटांतील तरुणांची समजूत घातली. मात्र, काही वेळात प्रेमनगरात राहणारे ८ ते १० तरुण हातात तलवार, रॉड आणि लाठ्या घेऊन त्या ठिकाणी आले. त्यातील शुभम चौरसिया (२५), निशू राकेशिया (२७), शुभम जयसिंगपुरे (२५), अमित शर्मा (२३), प्रतीक बोकडे (२४) आणि त्यांच्या काही साथीदारांनी महेंद्र सेन यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेले. सेन यांना मित्रांनी रुग्णालयात नेले होते. त्यांच्या बयानावरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

आरोपींनी केला पुन्हा हल्ला
यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी मोकाट होते. काही आरोपींनी रात्री आठच्या सुमारास पुन्हा सेन यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते आरडओरड, शिवीगाळ करून धमक्‍या देत असल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले. नागरिकांनी याबाबत नियंत्रण कक्षात आणि यशोधरानगर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपींनी पळ काढला. 

दगड लागल्याने युवक जखमी  
नंदनवनमध्ये पंतगाच्या वादातून झालेल्या दगडफेकीत हर्षल जयराम मुंडले (रा. सद्‌भावनानगर) हा युवक गंभीर जखमी झाला. सूत्रांनुसार, दुपारी साडेतीनच्या दरम्यान हर्षलच्या घराच्या बाजूच्या छतावर आरोपी अमोल व त्याचे सात ते आठ मित्र पतंग उडवीत पार्टी करीत होते. अमोल व त्याचे साथीदार शिवीगाळ करून शेजाऱ्यांना त्रास देत असल्याने हर्षलने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. हर्षलने अमोलला मारहाण केल्याने वाद चिघळला. काही वेळाने अमोलने साथीदारासोबत येऊन हर्षलच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून दगडफेक केली. यात हर्षलच्या तोंडाला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून आरोपींविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मांजा तोडल्याने मारहाण
अजनीतील धाडीवाल ले-आउट परिसरात पतंग उडविताना दुसऱ्याचा मांजा तोडल्याच्या कारणातून उद्भवलेल्या वादातून एकास जबर मारहाण करून त्याच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार दीपक रामलाल कनोजिया (४२) याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपींमध्ये राकेश शहा, सुनील शहा, पीयूष गौर, निखिल, राहुलसह ३ ते ४ आरोपींचा समावेश आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com