महाठक बघेलने काढले ‘न्यूज चॅनेल’

महाठक बघेलने काढले ‘न्यूज चॅनेल’

नागपूर  - देशभरात हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीने गंडा घालणाऱ्या महाठकाला नागपूर पोलिसांनी छिंदवाड्यातून अटक केली. या महाठगाने देशाच्या राजधानी दिल्लीपासून तर चेन्नईपर्यंतच्या गुंतवणूकदारांना गंडविले आहेत. काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्याने ‘न्यूज चॅनेल’ काढले असून त्याची अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. पुष्पेंद्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल असे या महाठगाचे नाव आहे.

पुष्पेंद्र बघेल (सेमरपाखा, ब्योहारी, जि. शहडोल, मध्य प्रदेश) याने झटपट पैसा कमविण्यासाठी २००९ मध्ये सात मित्रांनासोबत घेऊन साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने कंपनी स्थापन केली. मध्य प्रदेशात आणि राजस्थानमधील जयपूरला या कंपनीचे मुख्यालय सुरू केले. कंपनीत फिक्‍स डिपॉझिट केल्यास अडीच वर्षांत दुप्पट तर चार वर्षांत तिप्पट रक्‍कम परत करण्याचे आमिष दाखवत होता. कंपनीच्या प्रचार प्रसारासाठी त्याने गलेलठ्‌ठ पगारावर एजंट  नेमले होते. त्यामध्ये सुंदर तरुणींचा भरणा केला. यंग ब्रिगेड गुंतवणूकदारांना वेगवेगळी आमिष दाखवून जाळ्यात अडकवत होते. बघेलच्या चमूने लोकांना दुप्पट आणि तिप्पट रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले. राजस्थान, मध्य प्रदेश, नोएडा दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत शाखा उघडल्या. मात्र, मध्य प्रदेशात काही  एजेंटने लाखोंचा अपहार केल्याने भांडे फुटले. बघेलच्या फसवणुकीच्या नेटवर्कची माहिती मिळाल्याने सेबीने त्याची चौकशी सुरू केली. सेबीने गुंतवणूकदारांची ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली. बघेलच्या फसवणुकीचा आकडा थक्‍क करणारा असल्यामुळे सीबीआयनेही चौकशी सुरू केली. बघेलचे पुरते पर्दाफाश झाल्यामुळे हजारो  गुंतवणूकदार रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलने आणि पोलिस, जिल्हाधिकारी आणि सीबीआयकडे निवेदने-तक्रारी दिल्या. त्यामुळे बघेलच्या देशातील सर्वच शाखांवर सीबीआयने तीन वर्षांपूर्वी छापे मारले. त्याची देशभरातील २५०  कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखाचे (आर्थिक विंग)  पोलिस निरीक्षक बी. एस. नरके करीत आहेत.

नागपुरातही फसवणूक  
पुष्पेंद्र बघेल यांनी नागपुरातील काही दलालांची फिल्ड ऑफिसर्स या गोंडस नावाने गलेलठ्‌ठ  पगार देऊन नेमणूक केली. त्यांनी आपल्या नातेवाइकांसह शेकडोंना आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यात प्राध्यापक, डॉक्‍टर, वकील, पोलिस अधिकारी, व्यापारी, दुकानदार, प्रॉपर्टी डिलरसह काही राजकीय व्यक्‍तींचाही समावेश आहे. फसवणूकप्रकरणी धंतोली, जरीपटका, कळमना आणि सदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

अशी केली गुंतवणूक
बघेलने जवळपास आठ राज्यांत मोक्‍याच्या ठिकाणी मोठमोठे भूखंड विकत घेतले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थानात शेकडो एकर शेती विकत घेतली. काही ठिकाणी प्लॉट्‌स पाडून विक्री केली तर काही ठिकाणी फार्महाउस बांधले. राजस्थान आणि दिल्लीत फ्लॅट स्किम उभारल्या तर काही पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

३ महिने ते २० वर्षे 
साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड नावाने कंपनी काढून तीन महिने ते २० वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीचे प्लॅन तयार केले. वर्षभरापर्यंतच्या गुंतवणूकदारांना परतावा दिला. त्यामुळे लोकांचा विश्‍वास बसला. पाहता-पाहता नागपुरातील गुंतवणुकीची रक्‍कम कोट्यवधीत गेली. अनेकांनी तीन वर्षांपर्यंतचे प्लॅन घेऊन गुंतवणूक केली. मात्र, पुष्पेंद्रने अडीच वर्षांतच नागपुरातील कंपनी बंद करून पोबारा केला. 

न्यूज चॅनेल आणि मोबाईल हॅण्डसेट
पुष्पेंद्र बघेलने शेकडो कोटींची काळी कमाई केली. हा पैसा गुंतविण्यासाठी ‘खबर भारती’ नावाने न्यूज चॅनेल सुरू केले. तसेच मोबाईल हॅण्डसेट बनविणारी कंपनी उघडली. या कंपनीत महागडे मोबाईल हॅण्डसेट तयार केले. मात्र, न्यूज चॅनेल आणि मोबाईल कंपनीसुद्धा दलालांनी पोखरून खाल्ली. लोकांना गंडविणाऱ्या पुष्पेंद्रला दलालांनीच पोखरले.

पुष्पेंद्रचा दिल्लीत थाट
पुष्पेंद्रने दिल्लीतील नोएडातील पॉश भागात कोट्यवधीचे आलिशान ऑफिस बनविले. बड्या वेतनावर उच्चशिक्षित आणि सुंदर तरुणी कार्यालयात ठेवल्या. दिल्लीतून तो देशभरातील कार्यालयातील हिशेब घेत होता. त्याचा सर्वाधिक वेळ विमान प्रवासात जात होता. देशाच्या कानाकोपऱ्यात त्याने शाखा उघडल्याने आठ ते दहा तास तो विमानात राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com