कुख्यात सोनसाखळी चोरट्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर - छत्तीसगड व महाराष्ट्रात जवळपास ४० पेक्षा जास्तवेळा सोनसाखळीचे गुन्हे करणारा कुख्यात सोनसाखळी चोर प्रदीप लोकेश बोंदरेला (३७, रा. ज्ञानेश्‍वरनगर, अजनी) गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

नागपूर - छत्तीसगड व महाराष्ट्रात जवळपास ४० पेक्षा जास्तवेळा सोनसाखळीचे गुन्हे करणारा कुख्यात सोनसाखळी चोर प्रदीप लोकेश बोंदरेला (३७, रा. ज्ञानेश्‍वरनगर, अजनी) गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

प्रा. अरुण चतुर्वेदी (रा. बाजीप्रभूनगर) यांची पत्नी अलका २० जुलैला सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक करीत होत्या. प्रदीपने अलका यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. अंबाझरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास सहनिरीक्षक ज्ञानेश्‍वर भेदोडकर व शत्रुघ्न कडू यांच्याकडे आला. त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरुवात केली. प्रदीपवर लक्ष केंद्रित झाले. मात्र, तो छत्तीसगड-रायपूर येथे राहत असल्याचे कळले.

त्याच्यावर २००५ ते २०१३ पर्यंत १८ चेनस्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते. रायपूर येथेही १३  गुन्हे दाखल होते. या प्रकरणात तो दीड वर्षे रायपूर जेलमध्ये शिक्षा भोगून जानेवारीत बाहेर  आला. तेव्हापासून तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. २०१४ पासून तो केंद्र शासनाअंतर्गत भूवैज्ञानिक विभागात नोकरीवर असलेल्या आईसह राहत होता. त्याचा लहान भाऊ नागपुरात बॅंकेत असून, तो तीन महिन्यातून भावाकडे येत होता. नागपूरला येताच तो भावाच्या दुचाकीने चेनस्नॅचिंग करीत होता, अशी माहिती डीसीपी संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदीप बोंदरेवर अजनी पोलिस ठाण्यात सर्वाधिक १८ गुन्हे दाखल आहेत. त्याने चोरलेले काही सोन्याचे दागिने मानेवाडा येथे राहणारा ऑटोचालक मित्र जितेंद्र राजवल्लभ पाण्डेयला विक्रीसाठी दिले होते. पोलिसांच्या जितेंद्रकडून दागिने जप्त केले. त्याने रायपूरमध्येही २० पेक्षा जास्त सोनसाखळी चोरल्या आहेत.

जुगार खेळणासाठी बनला चोर
प्रदीपने वयाच्या १७ व्या वर्षीच आजीची सोनसाखळी चोरून विकली. तेव्हापासून त्याला चोरी करण्याची सवय लागली. त्यानंतर त्याला जुगार खेळण्याची आणि दारूची सवय लागली. जुगार खेळण्यास पैसे मिळविण्यासाठी तो सोनसाखळी चोरी करायला लागला. सुरुवातीला तीन वर्षे तो सापडला नाही. त्यामुळे तो कुख्यात बनला.