अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला चपराक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नागपूर - जन्मदाती आई, आयुष्याची अर्धांगिनी असलेली पत्नी आणि कुटुंबाची पणती असलेल्या पोटच्या मुलीकडे दुर्लक्ष करून विविध महिलांशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बाहेरख्याली पतीला शुक्रवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चपराक लगावली. पतीने कुटुंब न्यायालयातून मिळविलेल्या घटस्फोटावर स्थगिती देत आईकडे दुर्लक्ष करणे ही क्रूरता असल्याचा मुद्दा नोंदवून घेतला. 

शंकर आणि सुरेखा (दोन्ही नावे काल्पनिक) यांचे 27 जुलै 1981 रोजी लग्न झाले. यातून त्यांना एक मुलगी झाली. शंकर हा सरकारी नोकर आहे. सारे काही सुरळीत सुरू असताना बाहेरख्याली असलेल्या शंकरचे विविध महिलांशी अनैतिक संबंध होते. यातून पती-पत्नीत भांडण व्हायचे. यामध्ये वृद्ध आईने मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केल्यास तिलादेखील शंकर शिवीगाळ करायचा. घरातील कुठल्याही सदस्याबद्दल जिव्हाळा न ठेवता शंकर इतर महिलांसोबत असलेल्या संबंधांमध्ये खूश होता. यातूनच त्याला अनौरस अपत्य झाले. ही बाब कायदेशीर करण्यासाठी त्याने पत्नीवर खोटे आरोप लावून कुटुंब न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2017 रोजी घटस्फोट मंजूर केला. या निर्णयाविरुद्ध सुरेखाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. 

या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान शंकरने कधीही पत्नीला तसेच स्वत:च्या आईला मानसन्मान दिला नाही. वृद्धावस्थेत आईची हेळसांड केली. मुख्य म्हणजे शंकरच्या आईची संपूर्ण जबाबदारी सुरेखाने पार पाडली. तसेच तिच्याकडे असताना त्यांचा मृत्यूदेखील झाल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेत न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली.