सात जणांची जन्मठेप कायम, चौघे निर्दोष

सात जणांची जन्मठेप कायम, चौघे निर्दोष

नागपूर - बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा पिंटू शिर्के हत्याकांडप्रकरणी मंगळवारी (ता. ३१) सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यामध्ये एकूण ११ आरोपींपैकी सात जणांची जन्मठेप आणि इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली, तर अन्य चौघांना निर्दोष मुक्त करण्यात आले. जन्मठेप कायम असलेल्यांमध्ये विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी तर निर्दोष सुटलेल्यांमध्ये मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांचा समावेश आहे. 

नागपूर जिल्हा न्यायालयात प्रचंड गाजलेल्या पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपींनी उच्च न्यायालयाने  बजावलेल्या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर न्यायमूर्तीद्वय आदर्श गोयल आणि उदय लळीत यांनी निर्णय दिला. या प्रकरणी १८ ऑक्‍टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रकरणातील १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यात मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांच्यासह अयुब खान अमीर खानचा समावेश होता. वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार आणि बांते यांच्यासह मयूर ऊर्फ बंटी शिवाजी चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप निळकंठ सणस यांना निर्दोष सोडण्यात आले होते. यानंतर सत्र न्यायालयात शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले. तसेच, पिंटू शिर्केची आई विजया व राज्य शासनानेही सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. 

उच्च न्यायालयाने दोषी सर्व अपिलांवर एकत्र सुनावणी करून २२ जून २०१५ रोजी निर्णय जाहीर केला. त्यामध्ये मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांची शिक्षा कायम ठेवली तर अयुब खानला निर्दोष सोडले. तसेच, सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याविरुद्ध ११ आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने ११ पैकी सात जणांना दोषी तर चार जणांना निर्दोष सोडले. या प्रकरणी वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता, वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता, ॲड. प्रफुल्ल मोहगावकर, ॲड. राजेश तिवारी, ॲड. उदय डबले यांनी बाजू मांडली. 

जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पिंटू शिर्के यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा ७००० चौरस फुटांचा एक प्लॉट होता. त्यावर विजय मते याने अवैध कब्जा केला होता. तो जागा सोडत नाही म्हणून पिंटू शिर्के याने एका साथीदाराच्या मदतीने रघूजीनगर भागात विजय मते यांच्यावर गोळीबार केला. मात्र, विजय मते या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले होते. पुढे याच वादातून पिंटू शिर्केच्या लोकांनी संजय गायकवाडची हत्या केली होती. १९ जून २००२ रोजी याच दोन प्रकरणांच्या सुनावणीसाठी पोलिसांनी पिंटू शिर्के आणि त्याच्या एका साथीदाराला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी पूर्ण तयारीनिशी आलेल्या विजय मते आणि त्याच्या सराईत गुन्हेगार साथीदारांनी न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावर सर्वांच्या देखत पिंटू शिर्केची हत्या केली होती.

एकाला पकडण्यात अपयश
एकूण १७ आरोपी असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली. नोव्हेंबर २०११ पासून प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली. सत्र न्यायालयाने त्या प्रकरणात तत्कालीन काँग्रेस नगरसेवक विजय मते, राजू भद्रे, किरण कैथे, उमेश डहाके, कमलेश निम्बार्ते, अयुब खान पठाण, रितेश गावंडे, दिनेश गायकी अशा आठ जणांना जन्मठेप सुनावली. तर इतर सहा जणांची निर्दोष सुटका केली. पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाला तर एकाला शेवटपर्यंत पोलिस पकडू शकले नाहीत. 

पोलिसही झाला होता फितुर
विशेष म्हणजे पिंटू शिर्के याची हत्या गर्दीच्या ठिकाणी न्यायालयात लिफ्टजवळ झाल्याने या प्रकरणात मोठ्या संख्येने प्रत्यक्षदर्शी होते. मात्र, या हत्याकांडात नागपूरचे सराईत गुन्हेगारच आरोपी असल्याने तपासादरम्यान पोलिसांना फारसे साक्षीदार मिळाले नाहीत. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान एकूण ४१ जणांची साक्ष झाली. मात्र, बहुतांश साक्षीदार बयाणापासून पलटले. धक्कादायक म्हणजे ज्या पोलिस हवालदाराच्या ताब्यातून पिंटू शिर्केला हिसकावून त्याची हत्या केली होती, तोच या प्रकरणात मुख्य फिर्यादी होता, पण त्यानेही आपली साक्ष बदलली. मात्र, पिंटू शिर्केची आई आणि बहीण हे त्यांच्या साक्षीवर कायम राहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com