दुतोंडी सापाची हैदराबादला तस्करी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने बुधवारी सायंकाळी दक्षिण एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत दुतोंडी सापाची तस्करी उघडकीस आणली. तस्कराला अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे १५ लाख रुपये किमतीचा दुतोंडी साप हस्तगत केला. हा साप विक्रीसाठी हैदराबादला नेला जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. 

सामन सनी गोसावी (२५ रा. अलाहबाद, उत्तर प्रदेश) असे अटकेतील तस्कराचे नाव आहे. निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्‍स्प्रेसमधून दुर्मिळ प्रजातीच्या सापाची तस्करी होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर निरीक्षक भगवान ईप्पर यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठित करण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गाडी  येताच दबा पथकाने वेगवेगळ्या डब्यांचा ताबा घेतला. 

शेवटच्या जनरल डब्यात गोसावी हा संशयास्पद अवस्थेत बसून होता. विचारपूस केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात चार ते पाच फूट लांबीचा दुतोंडी  साप आढळला. 

चौकशीत त्याने सापाच्या तस्करीची कबुली दिली. त्याने अलाहबादच्या जंगलातून साप पकडला असून, हैदराबादला विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. वेगवेगळ्या प्रकारचे साप पकडून त्यांची विक्री करणे हाच त्याचा व्यवसाय आहे. आजवर असंख्य साप पकडून विक्री केल्याची कबुली त्याने दिली. आधीच ठरल्याप्रमाणे हैदराबाद येथील एक व्यक्ती या सापाची खरेदी करण्यास तयार होता. घटनेची माहिती देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात  आले. कागदोपत्री कारवाईनंतर हा साप व तस्कराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. कारवाईत उपनिरीक्षक अरुण ठवरे, सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी आदींचा समावेश होता.