बापलेकाला तीन वर्षे कारावास

बापलेकाला तीन वर्षे कारावास

नागपूर - बकरीच्या पिलावरून झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या बापलेकाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी मंगळवारी (ता. २१) तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींची नावे जालंधर महादेव झिंगारे (२४) आणि महादेव लक्ष्मण झिंगारे (५६) दोन्ही रा. तांडा  अशी आहेत.

ही घटना १८ जून २०१५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. आरोपींवर मुकेश मारोती फटिंग (२६) आणि सुरेश मारोती फटिंग (३०) दोन्ही रा. तांडा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. जखमी फटिंग बंधू आणि झिंगारे पितापुत्र  एकमेकांच्या शेजारी राहायचे. घटनेच्या दिवशी फटिंग बंधूंचे बकरीचे पिलू आरोपी झिंगारे यांच्या घरात शिरताच जालंधर आणि महादेव यांनी फटिंगच्या घरावर जाऊन त्यांच्याशी भांडण केले. मुकेशचा मोठा भाऊ सुरेश जन्मत:च मूक असूनही त्याने आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याला आरोपींनी जुमानले नाही. अखेर भांडण विकोपाला जाऊन जालंधरने मूक सुरेशच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून जखमी केले. महादेवनेही सुरेशवर चाकूने वार केले. मुकेशने आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुरेशला भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुकेश फटिंग याच्या तक्रारीवरून अरोली पोलिसांनी भादंविच्या ३०७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सुरेश हा मूक असल्याने त्याचे मौखिक मृत्यूपूर्व बयाण नोंदवून न घेता, त्याने हे बयाण स्वत: लिहून दिले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर ३०७ कलमांतर्गतचा गुन्हा ३२४ कलमांतर्गत परिवर्तित करून आरोपींना शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मदन सेनाड तर आरोपींतर्फे ॲड. एस. एल. कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com