बसपोर्टच्या धर्तीवर बसस्थानकाचा विकास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - नागपुरात होत असलेली विविध विकासकामे आणि येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे शहराला वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बसपोर्टसारखा मोरभवन येथील बसस्थानकाचा विकास केला जाणार आहे. एसटीसह शहर बसस्थानक एकत्र असणार आहे.

नागपूर - नागपुरात होत असलेली विविध विकासकामे आणि येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे शहराला वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बसपोर्टसारखा मोरभवन येथील बसस्थानकाचा विकास केला जाणार आहे. एसटीसह शहर बसस्थानक एकत्र असणार आहे.

बहुमजली बसस्थानकाच्या इमारतीवर उंचीवर प्रस्तावित मेट्रो रेल्वे स्थानक, उड्डाणपूल बसस्थानकाला जोडले जाईल. येथे प्रस्तावित प्रत्येक सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित  प्रकल्पामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा निर्णय नागपूर येथे बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नागपूर महापालिकेचे आयुक्त अश्विन मुद्‌गल, नागपूर महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, नागपूर मेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक नंदनवार, राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी उपस्थित होते. एसटी महामंडळाने नियुक्त केलेल्या सल्लागाराकडून सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर प्रथम बसपोर्टवर सादरीकरण करण्यात आले.त्यानंतर विविध शासकीय यंत्रणांनी नागपूरच्या गजबजलेल्या बर्डी परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आवश्‍यक सूचना केल्या. नागपूर मेट्रो च्या प्रस्तावित मुंजे चौक, व्हेरायटी चौक आणि झाशी राणी चौक जवळीस तिसऱ्या अशा विविध रेल्वेस्थानकांना प्रस्तावित बस पोर्टला जोडण्याकरिता आवश्‍यक स्काय वॉक व उड्डाणपुलावरील मार्गासह इतर बाबींवर चर्चा झाली.

नागपूर महापालिकेचे आयुक्त मुद्‌गल यांनी शहरात सध्या धावणाऱ्या शहर बसेस व त्याचा भविष्यात होणारा विस्तार, सामान्यांना बसस्थानकावर उतरताच आवश्‍यक असलेली ऑटोरिक्षासह टॅक्‍सीच्या सेवा उपलब्धतेसाठी बाबींवर प्रकाश टाकला. बसस्थानकासह नागपूर मेट्रो रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बर्डीत काम नसल्यास ते रस्त्यावर न येताच उड्डाणपूल, बस वा इतर कसे, बाहेरच्या बाहेर उड्डाणपुलावरून जाऊ शकतील यावरही चर्चा झाली. बैठकीत ४ ते ५ मुद्यांवर सगळ्या विभागाचे एकमत झाले. परंतु, विविध विभागाकडून आलेल्या सल्ल्यानुसार १ ते २ विषयांवर नागपूर मेट्रोच्या आर्टिटेक्‍टने पुढाकार घेऊन प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय याप्रसंगी झाला. पहिल्या टप्प्यातील बैठक यशस्वी झाल्यामुळे मोरभवनच्या बसस्थानकाचा विकास होऊन येथील मॉलसह इतर अद्ययावत सेवा लवकरच नागपूरकरांना मिळण्याची शक्‍यता आहे.