संविधान बदलण्याचा विचार करणेही देशद्रोह - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ संविधान निर्माता नव्हते तर ते राष्ट्रनिर्माता होते. त्यांच्या संविधानामुळे भारत देश बलशाली राष्ट्र म्हणून उभे आहे. संविधानाने देशाला सामाजिक ऐक्‍यातून शक्ती दिली आहे

नागपूर - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानसारखे अस्त्र दिले. संविधानाने संधिची समानता दिली आहे. संविधानाचा मी अभ्यासक आहे. जगातील अनेक देशांच्या संविधानाच्या अभ्यास केला असून भारताचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे. यामुळे संविधान बदलण्याचा नुसता विचार करणे हा देशद्रोह ठरेल,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत कोट्यवधी अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मक्रांतीचा 61 वा वर्धापनदिन सोहळा दीक्षाभूमीवर साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल, महापौर नंदा जिचकार, उपस्थित होते. 

अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीवर उधाण आलेल्या भीमसागराला उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ संविधान निर्माता नव्हते तर ते राष्ट्रनिर्माता होते. त्यांच्या संविधानामुळे भारत देश बलशाली राष्ट्र म्हणून उभे आहे. संविधानाने देशाला सामाजिक ऐक्‍यातून शक्ती दिली आहे. बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म दिला, त्या तथागत बुद्धाच्या विचारातून जपान प्रगत राष्ट्र म्हणून जगात मानाचे स्थान आहे. बुद्धाच्या विचारातूनच भारत देश महासत्ता बनेल असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

दीक्षाभूमीवर भारतासह जगभरातून बौद्ध अनुयायी येतात. दीक्षाभूमीचा आणखी विकास करण्याची गरज आहे. यासाठी आजूबाजूची जागा लवकरात लवकर देण्याची विनंती पूज्य भदंत नागाजुर्न सुरई ससाई यांनी केली. प्रास्ताविक सदानंद फुलझेले यांनी केले. संचालन विलास गजघाटे यांनी केले. 

नदी जोड प्रकल्पाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर  - केंद्रीय मंत्री गडकरी 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, डॉ. आंबेडकर केवळ संविधान निर्माते, महान अर्थशास्त्री नव्हते तर ते व्हीजनरी होते. यावेळी त्यांनी आंबेडकरी विचारांचे संशोधक डॉ. एम. एल. कासारे यांच्या पुस्तकाचा हवाला देत बाबासाहेबांनी मंत्रीमंडळात काम करताना देशाच्या विकासाचे 11 व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले होते. डॉ. आंबेडकर यांचे त्यावेळचे विचार आजही शाश्‍वत आहेत. नदी जोड प्रकल्पाचे ते शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचेच नाव पुढे आले. ही संकल्पना त्या काळात त्यांनी मांडली होती. आज सरकारने 111 नद्यांना जोडण्यांना प्रकल्प हाती घेतला आहे. बाबासाहेबांनी बुद्धांच्या सामाजिक समता, न्याय, बंधुत्त्वाचा संदेश दिला. जुन्या काळात काहींवर अन्याय झाला. तो आता समता, न्यायाच्या तत्त्वातून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर आरक्षण संपविणार नसल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी यावेळी केला.

जग आतंकवादाच्या भयाच्या उंबरठ्यावर उभे असताना बुद्धांच्या विचारानेच विश्‍वाचे कल्याण होणार असल्याचे गडकरी म्हणाले. 

दीक्षाभूमीसाठी 100 कोटीचा प्लॉन 

दीक्षाभूमी विकासाचा 100 कोटीचा मास्टर प्लॉन तयार केला आहे. लवकरच कार्यान्वित होईल. सर्वोत्तम सुंदर स्थळ व्हावे म्हणून सर्व व्यवस्था दीक्षाभूमीवर केली जाईल. त्यासाठी समोरची आवश्‍यक जागा दीक्षाभूमीला देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करीत आहे. आवश्‍यक जागा लागेल ती उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय बुद्धीस्ट सर्किटची निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीवर दिली. 

हिंदू-बौद्ध एकत्र आल्यास संघर्ष टळेल : आठवले 

हिंदू आणि बौद्ध एकत्र आल्यास देशात होणारे संघर्ष सहज टाळता येतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. ते म्हणाल, अडीच हजार वर्षापूर्वीपासून बुद्धाचा विचार आहे. पूर्वी सारा समाज बौद्ध होते. भारतासह जगातील अनेक राष्ट्रात बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म पाली भाषेत आहे. त्यामुळे पाली भाषेला संविधानाच्या अनुसूचित समावेश करावा अशी मागणी आठवले यांनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या काळात संविधान सुरक्षित आहे. तर आरक्षण कुणी संपवू शकत नाही. दीक्षाभूमीच्या विकासासाठी आवश्‍यक तेवढा निधी सरकार देईल, असेही ते म्हणाले.