संघर्षाचा वारसा मुलाच्या खांद्यावर

संघर्षाचा वारसा मुलाच्या खांद्यावर

नागपूर - वाट्याला आलेला वर्षानुवर्षांचा अन्याय मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये. त्यांना घटनादत्त अधिकार मिळावे, या ध्यासाने बापाने शासनविरोधातील लढ्यात उडी घेतली. समाजाचा मेळावा आटोपून परतीच्या प्रवासात काळाने झडप घातली आणि बापाचे ध्येय अपूर्ण राहिले. आता त्यांच्या मुलाने संघर्षाचा वारसा आपल्या खांद्यावर घेतला आहे. बापाचा फोटो हाती घेऊन धनगर समाजाच्या मोर्चात सहभागी या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गणेश घुगे असे मुलाचे नाव. तो लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी आहे. इयत्ता नववीचा विद्यार्थी असलेल्या गणेशचे वडील नवनाथ घुगे धनगर आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय सहभागी होते. पेशाने ड्रायव्हर असले तरी धनगर समाजाच्या आंदोलनात त्यांची उपस्थिती असायची. नोव्हेंबर महिन्यात नागपुरात आयोजित मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते सहकाऱ्यांना चारचाकीने घेऊन आले. परतीच्या प्रवासात नांदेडजवळ वाहनाला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरुषच गमावल्याने घुगे कुटुंबावर मोठा आघात झाला.

कठीण परिस्थिती व अल्लड वयातही गणेशने स्वत:ला, आई, गंगाधर व हृषिकेश या धाकट्या भावांना सावरले. वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा निर्धार करून वडिलांच्या संघर्षाचा वारसा स्वत:च्या खांद्यावर घेतला. महिनाभराच्या अंतराने आयोजित समाजाच्या मोर्चात तो हिरिरीने सहभागी झाला. वडिलांचा फोटो कळजाशी धरून त्याने मार्गक्रमण केले. मुलाबाळांसाठी हक्क मिळवून आणतो, असे सांगून बाबा मेळाव्यात गेले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे याच अपेक्षेने मोर्चात सहभागी झाल्याचे तो सांगत होता.

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
 धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे लाभ मिळावे.
 सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव द्या.
 धनगरांचा मेंढपाळ चराईचा प्रश्‍न सोडवा.
 धनगर बांधवांना शासकीय सेवेतून बडतर्फची कारवाई थांबवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com