डिजिटल पोलिसिंगचा फज्जा!

डिजिटल पोलिसिंगचा फज्जा!

नागपूर - वृद्धावस्थेत पदार्पण केलेल्या पोलिस हवालदार आणि सहउपनिरीक्षक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांकडे पोलिस ठाण्यातील सर्वांत मोठे जबाबदारीचे ‘ड्यूटी ऑफिसर’ पद देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ ठरत आहेत. मात्र, नाईलाजास्तव त्यांना कर्तव्य बजावे लागत असल्यामुळे वृद्ध पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा  सूर आहे. मात्र, आता कुणाकडे दाद मागावी, अशा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे. 

पोलिस ठाण्यातील ‘ड्यूटी ऑफिसर’ (डीओ) हे सर्वांत महत्त्वाचे पद आहे. प्रत्येक दिवशी दोन पाळींमध्ये दोन अधिकाऱ्यांना हे पद देण्यात येते. यापूर्वी केवळ पोलिस उपनिरीक्षक किंवा  सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांनाच हे पद देण्यात येत होते. कर्तव्याची जाणीव आणि पोलिस स्टेशन सांभाळण्याची जबाबदारी पाहता हा निर्णय योग्य होता. कायद्यातील बारीक-सारीक बाबींचे ज्ञान एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना असते. मात्र, पोलिस शिपायी म्हणून पोलिस विभागात भरती झाल्यानंतर बढती मिळाल्यामुळे हवालदार किंवा एएसआय पदापर्यंत गेलेल्या कर्मचाऱ्यास तंतोतंत माहिती नसते. 

मात्र, तरीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वृद्ध पोलिस हवालदार किंवा एएसआय कर्मचाऱ्यांना ड्यूटी  ऑफिसर पद सांभाळावे लागत आहे. पोलिस हवालदारांना ड्यूटी ऑफिसर बनविण्यात येत असल्यामुळे नव्या दमाच्या पोलिस उपनिरीक्षकांची जबाबदारी कमी करण्यात आली. त्यामुळे अनेक पोलिस उपनिरीक्षकांच्या हाताला काम नसल्याने त्यांचा ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराकडे कल वाढत असल्याची चर्चा आहे.

प्रत्येक घटनास्थळावर भेट 
ड्यूटी ऑफिसर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला दिवसात घडलेल्या प्रत्येक घटनास्थळी जावे लागते. घटनास्थळ पंचनामा, इन्क्‍वेस्ट, साना, पोलिस ठाण्यातील अनेक नोंदी तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक फिर्यादींच्या तक्रारींची नोंद घ्यावे लागते. त्यानंतर तपासाच्या अनेक प्रलंबित प्रकरणांचा तपासही त्यांच्याकडे असतो. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर तपासाचे ओझे नेहमीचेच आहे.

संगणकाच्या ज्ञानाचा अभाव
सध्या नागपूर पोलिस विभाग डिजिटल पोलिसिंगकडे पाऊल टाकत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. माहिती एका क्‍लिकवर असे तंत्र अंमलात आहे. मात्र, वृद्ध पोलिस कर्मचाऱ्यांना संगणकाचे योग्य ज्ञान नसल्यामुळे डिजिटल पोलिसिंगमध्ये अडथळा निर्माण होत आहे. 

९० टक्‍के कर्मचारी आजारग्रस्त 
वृद्धत्वाकडे झुकलेले जवळपास ९० टक्‍के पोलिस कर्मचारी विविध आजाराने ग्रासलेले असतात. ब्लडप्रेशन, शुगर, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि अन्य आजार त्यांना जडलेले असतात. अशातच त्यांना अत्यंत जबाबदारीचे डीओ पद सांभाळावे लागत असल्यामुळे अतिरिक्‍त ताण त्यांच्यावर पडत आहेत. अशा वृद्ध पोलिस कर्मचाऱ्यांना एवढी महत्त्वाची जबाबदारी न देण्याबाबत पुनर्विचार करण्यात यावा, असा सूर पोलिस कर्मचाऱ्यांतून निघत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com