श्‍वानांनाही अक्षयपात्र

श्‍वानांनाही अक्षयपात्र

नागपूर - शहरातील जखमी श्‍वानांवर उपचारासाठी भांडेवाडीत तयार करणाऱ्या डॉग शेल्टरमध्ये आता श्‍वानांनाही अक्षयपात्र योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय येथे जखमी, विविध रोगाने ग्रासलेल्या श्‍वानांवर उपचारासाठी डॉक्‍टरसह आरोग्याच्या सुविधाही मिळणार  आहेत. याबाबत महापालिकेने पशुप्रेमी सामाजिक संस्थांसोबत चर्चा केली असून, दोन संस्थांकडे या डॉग शेल्टरची जबाबदारी देण्यात येईल.  

भांडेवाडीतील डम्पिंग यार्डजवळील डॉग शेल्टरची दुरवस्था व श्‍वानांच्या आरोग्याबाबत  ‘सकाळ’ने ८ ऑक्‍टोबर रोजी ‘डॉग शेल्टर नव्हे श्‍वानांची यमपुरीच !’ या ठळक मथळ्यासह वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने पशुप्रेमी संघटनांसह महापालिकेतही खळबळ माजली होती. या वृत्ताची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी तत्काळ डॉग शेल्टरमधील दुरवस्थेची पाहणी केली. याबाबत त्यांनी काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली. श्‍वानांना चांगले अन्न मिळावे यासाठी त्यांनी शाळांमध्ये अक्षयपात्र योजनेद्वारे विद्यार्थ्यांना जेवण पुरविणाऱ्या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्षेत्रातील दोन शाळांमध्ये ही योजना राबविली जात आहे. या योजनेचे लाभार्थी विद्यार्थी एखादवेळी गैरहजर असल्याने त्यांचे अन्न वाचते. हे अन्न श्‍वानांसाठी देण्यात येईल काय? याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी विचारणा केली असता संबंधित संस्थेने होकार दिला. दररोज १० ते १५ डबे वाचत असल्याने ते डॉग शेल्टरमध्ये देण्यात येणार आहे. येत्या ३० ऑक्‍टोबरपासून शाळा सुरू झाल्यानंतर अक्षयपात्रचा लाभ श्‍वानांनाही मिळणार आहे. याशिवाय पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी डॉग शेल्टरमध्ये सातत्याने स्वच्छतेचे निर्देश दिले. खाज झालेल्या श्‍वानांसाठी  वेगळे पाण्याचे टाके बांधणे तसेच त्यात डेटॉल आदींचा समावेश करून श्‍वानांच्या प्रवेशापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचा प्रस्तावही तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्‍वानांसाठी डॉक्‍टरचीही सुविधाही एका सामाजिक संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय येथे एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीचेही निर्देश त्यांनी दिले. या डॉग शेल्टरची जबाबदारी दोन सामाजिक संस्थांकडे सोपविण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. 

‘किंग कोबरा’ची श्‍वानांसह दिवाळी
किंग कोबरा ऑर्गनायझेशन यूथ फोर्सने शुक्रवारी डॉग शेल्टरमध्ये श्‍वानांसह दिवाळी साजरी केली. संपूर्ण डॉग शेल्टर दिव्यांनी सजविण्यात आले होते. एवढेच नव्हे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ऑर्गनायझेशनचे अभिषेक ठावरे, समीर शेगावकर, अंकित खलोडे, स्वप्नील बोधाने यांच्यासह मनपा कर्मचारी भानुदास बर्वे, उषा सोनटक्के आदींनी श्‍वानांसोबत  वेळ घालविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com