नाल्यात बुडून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नागपूर - वर्धा रोडवरील चिंचभुवन नाल्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मनीष राजाराम शेरकुरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोहणे येत नसल्यानंतरही अतिआत्मविश्‍वास दाखवून पाण्यात उडी मारल्याने त्याला जीव गमवावा लागला.

नागपूर - वर्धा रोडवरील चिंचभुवन नाल्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मनीष राजाराम शेरकुरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोहणे येत नसल्यानंतरही अतिआत्मविश्‍वास दाखवून पाण्यात उडी मारल्याने त्याला जीव गमवावा लागला.

राजाराम शेरकुरे हे मूळचे मध्यप्रदेशातील असून, कामाच्या शोधात नागपुरात आले होते. त्यांना मनीष हा 11 वर्षांचा एकुलता मुलगा होता. तो परसोडीतील शासकीय शाळेत आठव्या वर्गात शिकत होता. रविवारी मनीष घरातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर तो आढळून आला नाही. त्यामुळे राजाराम यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा शोध सोमवारीही सकाळपासूनच सुरू होता. कुणी अपहरण तर केले नसावे? कुठे निघून तर गेला नसावा? मित्रांच्या गावी गेला असेल का? असे अनेक प्रश्‍न होते. मात्र, दुपारच्या सुमारास चिंचभवन नाल्यात एका विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळल्याची खबर त्यांची कानी पडली. राजाराम आणि त्यांची पत्नी धावतच नाल्याजवळ पोहोचले. तेथे मनीषची चप्पल आणि कपडे आढळून आले. त्यामुळे त्याच्या आईने हंबरडा फोडला. तर कापडात झाकलेला मृतदेह पाहताच राजारामही खाली कोसळले. अन्य नातेवाइकांनी कसेबसे दोघांनाही सावरले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये रवाना केला आणि पोलिस ठाण्यात नोंद केली. 

... तर वाचला असता मनीष 
त्याचे जिवलग मित्र आकाश आणि शैलेश हे तिघेही रविवार असल्यामुळे चिंचभुवन नाल्यावर पोहायला गेले होते. तिघांनीही पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मनीषचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. तो गटांगळ्या खात असताना शैलेश आणि आकाशने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांनी लगेच बाहेर येऊन कुणाला सांगून मदत घेतली असती तर मनीषचा प्राण वाचला असता. 

भीतीपोटी राहिले गप्प 
मनीष बेपत्ता असल्यामुळे त्याचे आईवडील सगळीकडे शोध घेत होते. त्याचे जिवलग मित्र आकाश आणि शैलेश यांनाही विचारले. मात्र, "तो आमच्यासोबत नव्हताच' असे उत्तर दोघांनी दिले. त्यामुळे मनीष दिसत नसल्याचे पाहून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, मनीषचा आज मृतदेह आढळल्यानंतर दोघांनीही पोलिसांना पोहायला गेले असता मनीष पाण्यात बुडाल्याची हकिगत सांगितली. भीती वाटत असल्यामुळे काल सांगितले नसल्याची कबुली दोघांनीही दिल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली. 

आकाशने केली होती मनाई 
आकाश आणि शैलेश हे दोघे नाल्याच्या काठावर बसून पाणी अंगावर घेत आंघोळ करीत होते. दरम्यान, मनीषने पोहणे येत असल्याचे सांगून पाण्यात उडी मारणार असल्याचे सांगितले. मात्र, आकाशने त्याला पाणी खोल असून चिखलही असणार, अशी सल्ला देऊन पाण्यात उडी न मारण्यास बजावले होते. मात्र, मनीषचा अतिआत्मविश्‍वास नडला. त्यामुळे मनीषचा जीव गेला.

टॅग्स