औषध घोटाळ्याची तक्रार का नाही? 

औषध घोटाळ्याची तक्रार का नाही? 

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाऱ्या मनोरुग्णांना औषध विक्रीतून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण पुढे आले. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने घोटाळा करणाऱ्या राजकुमार डोमळे या कर्मचाऱ्याला निलंबित केले. मात्र या प्रकरणाची पोलिस तक्रार करण्यात आली नाही. यामुळे मानकापूर पोलिसांकडून औषध घोटाळ्याची पोलिस तक्रार का केली नाही, अशी विचारणा करणारे पत्र मनोरुग्णालय प्रशासनाकडे धडकले आहे. दरम्यान, महिना लोटूनही गेल्यानंतरही या प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाच्या सहसंचालकांकडे पोहोचला नसल्याची माहिती उघडकीस आली. 

मनोरुग्णालयात औषधासाठी आलेल्या मनोरुग्णांना ४० रुपयांची औषधी ८० रुपयांना विकत असल्याचे प्रकरण डोमळे या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे पुढे आले होते. या प्रकरणात अडकलेल्या डोमळे या कर्मचाऱ्याने शक्कल लढवून औषध विक्रीला वरकमाईचे साधन बनवले होते. ८० रुपये मनोरुग्णालयाच्या तिजोरीत न जाता केवळ ४० रुपयेच तो टाकीत होता. उर्वरित ४० रुपये हा कर्मचारी आपल्याजवळ ठेवत होता. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता. लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले. 

यानंतरही या कर्मचाऱ्याला त्याच जागेवर काम प्रशासनाने दिले. मात्र चौकशी समितीने ठपका ठेवल्यानंतर डोमळेला निलंबित केले. परंतु या प्रकरणात या कर्मचाऱ्याशिवाय 

इतरही मोठे अधिकारी असल्याची चर्चा रंगली असल्यामुळे या प्रकरणातील अंतिम अहवाल आणि घोटाळ्याची माहिती एका आठवड्यात सादर करण्यात येईल, असे मनोरुग्णालय प्रशासनाने कळविले होते. परंतु आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी हा अहवाल सादर केला नसल्याने  मुंबईत सहसंचालक डॉ. साधना तायडे यांनी बैठक बोलावली.

कारवाईत तत्परता 
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मनोरुग्णालय प्रशासनाने अतिशय तत्परता दाखवली आहे. प्रकरण पुढे येताच चौकशी समिती गठित केली. चौकशी झाली आणि आठ दिवसांत कर्मचाऱ्याला निलंबित केले. मात्र या प्रकरणात मोठे मासे अडकण्याची भीती असल्याची चर्चा आहे. यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com