दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो

दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो

नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा प्रसंग सांगताना केवळ नशिबानेच बचावल्याची भावना दुरांतोमधील प्रवाशांनी सकाळकडे व्यक्त केली.

दुरांतोमधील सर्वच प्रवासी साखर झोपेत होते. त्याचवेळी जोराच्या आवजानंतर सर्वजण बर्थवरून खाली पडले आणि अचानक रेल्वे थांबली. लागलीच गाडीतील दिवेही बंद झाले. बाहेर धुके असल्याने नेमके काय झाले, याचा अंदाज येत नव्हता. पण, मोठा अपघात झाल्याचे सर्वांनाच कळले होते. डब्यांच्या एका भागात उंच दरड तर दुसऱ्या भागात खोल दरी होती. यामुळे अनेकांना डब्यातून बाहेर पडणे शक्‍य होत नव्हते. संपूर्ण घटनाक्रमच धडकी भरविणारा ठरला. सर्वच घाबरले असले तरी एकमेकांना आधार देत सर्वजण मागच्या डब्यातून गाडीबाहेर पडले. कुठे जावे काही कळायला मार्ग नसल्याने तिथेच थांबून राहावे लागले. बऱ्याच वेळानंतर स्थानिक नागरिक मदतीला धावले. 

त्यांच्या माहितीनंतर सुमारे १ किमी लांब सुटलेले आसनगाव रेल्वेस्थानक गाठण्यासाठी अनेकांनी पायपीट केली. कुणाकडे सामान अधिक तर कुणासोबत वृद्ध प्रवासी होते. एकमेकांना मदतीचा हात देत हे अंतर सर्वांनीच कापले. तिथूनही मुख्य मार्गावर आल्यानंतर खासगी वाहनांमधून प्रवाशांनी पुढील प्रवास पूर्ण केला. 

नशिबानेच वाचले - दीक्षा राऊत
माजी मंत्री नितीन राऊत यांची पत्नी सुमेधा, मुलगी दीक्षा आणि मुलगा कुणाल याच गाडीच्या ए -१ डब्यातून प्रवास करीत होते. कुणाल राऊत अप्पर बर्थवर झोपला होता. गाडीला जोरदार धक्का बसल्याने कुणाल बर्थवरून खाली पडला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर सर्वच जीव मुठीत धरून गाडीतच बसले होते. गाडीतील एसी आणि लाइट बंद झाले होते. यामुळे सर्वांचाच जीव गुदमरत होता. खालच्या बाजूला आपत्कालीन खिडकी असल्याने ती फोडूनही फायदा नव्हता. सर्वत्र आंधार असल्याने बाहेर पडायचाही मार्ग सापडत नव्हता. इलेक्‍ट्रिकच्या वायर तुटून पडल्या होत्या. सुदैवाने वायरचा स्पर्श डब्याला झाला नाही. तो झाला असता तर आमचे काही खरे नव्हते. शेवटी एकमेकांना आधार देत एका शिडीच्या मदतीने आम्ही सर्व बाहेर पडलो. अंधारातच रुळावरून जवळपास एक किलोमीटर पायी चालत गावापर्यंत पोहचलो. तेथील वाहतूक पोलिसांना घटनाक्रम सांगितला. त्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. अपघात झाल्यावर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. आम्हाला भूकंप झाल्यासारखेच वाटले. केवळ नशिबानेच आम्ही सर्व बचावल्याचे दीक्षा राऊत यांनी सकाळशी बोलताना सांगितले. कुणालला मुंबईच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. 

एकमेकांना मदतीचा हात : अमित रामटेके
सर्वच प्रवासी बेसावध असताना झालेल्या अपघातामुळे वरच्या बर्थवरील अनेकजण खाली पडले. काय झाले, कुणालाही कळत नव्हते. सर्वत्र चिखल असल्याने डब्यातून बाहेर येणेही शक्‍य होत नव्हते. अपघातामुळे बरेच प्रवासी घाबरले होते. त्यात काही धीर देणारेही होते. युवावर्गाने मदतीचा हात पुढे करून सर्वांना बाहेर काढले. एकमेकांच्या मदतीच्या बळावरच प्रवासी आसनगाव स्थानकापर्यंत पोहोचल्याची माहिती नागपूरहून सहकुटुंब प्रवास करणारे अमित रामटेके यांनी दिली. 

स्वीयसहाय्यक विजय भुरे यांची आपबीती 
पहाटेच्या सुमारास साखरझोपेत असताना सकाळी ६.४० वाजता अचानक गाडी थांबली. काही क्षणातच इंजिनला लागलेला एचए व ए वन डब्यासह सात डबे रुळावरून घसरून निखळून आडवे झाले. बोगीत एकच गोंधळ उडाला. अपघात झाल्याचे समजताच हादरलेल्या स्थितीत निखळलेल्या गेटमधून दहा फुटावरून उडी घेतली. अपघाताची तीव्रता पाहता काही काळ स्तब्ध राहून आपण कसे बचावले, याचा विचार करीत ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय अनुभवल्याची आपबीती तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचे स्वीयसहाय्यक विजय भुरे यांनी सांगितली. गणपती बाप्पा व लोकांच्या आशीर्वादाने सुखरूप बचावल्याचे समाधान त्यांनी व्यक्त को. 
दुरांतो एक्‍स्प्रेसने विजय भुरे हे नागपूर येथून मुंबईला ए वन क्रमाकाच्या बोगीतून प्रवास करीत होते. पावसाची रिपरिप सुरूच होती. आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान अचानक गाडीचा  वेग कमी झाला. या वेळी मोठा आवाज झाला होताच अपघात झाल्याचे कळताच भंबेरी उडाली. या वेळी आमदार काळे यांचे स्वीयसहाय्यक कुय्यम शेख यांनी निखळलेल्या बोगीच्या चॅनल गेटमधून दहा फुटावरून उडी घेऊन डब्यातील सर्वांना मदतीचा हात दिला. त्यांच्या मदतीने आपणही उडी घेतली. या वेळी अपघात यानंतर सहा ते सात किलोमीटर अंतर रुळावरून पायदळ चालून नाशिक-मुंबई हायवेवरील खातवेली गाव गाठले. तेथून जिंदल स्टील कंपनीच्या वाहनाने मुंबई गाठली. अपघाताची भयावहता पाहता आपण वाचलोच कसे, हे सांगताना अंगावर शहारे  उभे होत असल्याचे श्री. भुरे यांनी सांगितले.

लोको पायलट ठरला देवदूत : घनश्‍याम निखाडे
लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुरांतोमधून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचा जीव वाचला. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. अचानक झालेल्या अपघाताने सर्वच प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला. भांबावलेले प्रवाशी मदतीच्या प्रतीक्षेत रेल्वेतच थांबून होते. बाहेर पडलेल्यांनाही कुठे आणि कसे जायचे काही सुचत नव्हते. बराच वेळ प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याचे हा प्रसंग स्वत: अनुभवणारे मनसेचे शहर सचिव घनश्‍याम निखाडे यांनी सांगितले.

मुलगी दीक्षाचा गाडीला अपघात झाल्याचा फोन आल्यावर माझी झोपच उडाली. तिने सर्व सुखरूप असल्याचे सांगताच जीव भांड्यात पडला. शेकडो प्रवासी अडकले असल्याने मदत पथकास फोन करण्यास तिने सांगितले. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एसएमएस पाठविला. त्यांनी लगेच दखल घेतली. नंतर रेल्वेला तसेच नाशिकमधील जवळच्या नातेवाइकांना कळविले. ते लगेच निघाले. या घटनेमुळे आपल्याला मोठा धक्का बसला होता. 
- नितीन राऊत, माजी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com