इको-फ्रेण्डली बाप्पा साकारण्यात रमली मुले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर - बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. चिमुकल्यांमध्ये बाप्पाच्या आगमनाने बराच उत्साह संचारला आहे. बाप्पामुळे घराघरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक चिमुकल्याला हवाहवासा असलेला ‘बाल गणेशा’ साकारण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ एनआयई’तर्फे वानाडोंगरी येथील महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि यशोदानगर येथील यशोदा मराठी प्राथमिक शाळेत ‘इको-फ्रेण्डली गणपती’ साकारण्यासाठी कार्यशाळा झाली. यावेळी गणपती साकारण्यासाठी चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अनेक मुले मूर्ती साकारण्यात रममान झाली होती. 

मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता प्रबोधन या दोन्ही उद्देशाने या कार्यशाळा झाल्या. यात महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि यशोदानगर येथील यशोदा मराठी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी ‘बाप्पा’ची मूर्ती साकारली. या वेळी बालगणेशाचे रूप साकारताना कपड्यांना पडणारे डाग असो वा हात खराब करणारी माती असो... कशाचीही पर्वा न करता, देहभान विसरून चिमुकल्यांनी त्यांचा फ्रेण्ड आवडता बाप्पा साकारला. कार्यशाळेत मूर्तिकार प्रकाश ठाकरे यांनी मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

यशोदा मराठी प्राथमिक हायस्कूलमध्ये मोहन तलवारे यांनी मार्गदर्शन केले. स्वत:च्या हातातून गणेशमूर्ती तयार होताना चिमुकले हरखून गेले. कोणी सिंहासनावर आरूढ, तर कोणी जास्वंदाच्या फुलाचा आकार असलेली गणेशमूर्ती साकारली. मूर्ती तयार करणाऱ्या बालकांना त्यांच्या शिक्षकांनीही तितकीच मदत केली. कार्यशाळेत महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक धर्मेद्र पारशिवनीकर, पर्यवेक्षिका दीपाली कोठे, रामचंद्र वाणी, दीपिका नाटके तर यशोदानगर येथील यशोदा मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा ढुमणे, वैशाली मिस्कीन, उषा बाक्षे, प्रमोद ढोणे, अरविंद वाकडे, प्रेरणा बरवट, सीमा वानखेडे, आरती चामाटे, उमा वैद्य, प्रतिमा गेडाम उपस्थित होत्या.  

सकाळ-एनआयईने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कलाकौशल्य व्यक्त करण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याची तसेच आपले सण साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची जाणीव निर्माण होईल. 
- प्रतिभा ढुमणे, मुख्याध्यापिका, यशोदा मराठी प्राथमिक शाळा, यशोदानगर

आजच्या शिक्षणप्रणालीमध्ये शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे. सरकारने यावरच भर देत, राष्ट्रीय कौशल्यविकास मिशन सुरू केले आहे. मातीच्या ढिगाऱ्याला योग्य असा आकार दिल्यास, त्याचे रूपांतर सुंदर मूर्तीत होते. त्यानुसारच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास योग्य व्यक्ती घडविता येणे शक्‍य होते. 
- धर्मेंद्र पारशिवनीकर, मुख्याध्यापक, महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल, वानाडोंगरी.

मातीच्या, दगडाच्या आणि सिमेंटच्या आजपर्यंत हजारो गणेशमूर्ती बनविल्या आहेत आणि भविष्यामध्येसुद्धा बनविणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून गणपती बनविण्याचा अनुभव अविस्मरणीय राहील.
- प्रकाश ठाकरे, मूर्तिकार, गुमगाव