बुके नको, पुस्तके देऊन पर्यावरणाचे रक्षण करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - वृक्षलागवडीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वतःचे घर, कार्यालयापासूनही छोट्याशा स्वरूपात सुरुवात करता येते. यासाठी फारसा खर्च येत नाही आणि कष्टही घेण्याची  गरज नाही. फक्त इच्छा शक्ती हवी आणि इतरांना त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. याची सुरुवात स्वागतासाठी बुके देण्याऐवजी पुस्तक देऊन करा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलचा  वापर बंद करा. या माध्यमातून सर्वांनी पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावावा, असे आवाहन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. पाटील यांनी केले.

सकाळच्या ‘ग्रीन डे’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मंगळवारी पाटील यांच्या हस्ते सकाळ कार्यालयात झाले. या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात २०.१३ टक्के जंगल आहे. यात विदर्भाचा वाटा सर्वाधिक ४५, पश्‍चिम महाराष्ट्र ३० टक्के आहे. मराठवाड्यात फक्त पाच टक्के वनक्षेत्र आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी राज्यातील वनक्षेत्र किमान ३३ टक्के असणे आवश्‍यक आहे. याकरिता यंदा चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प राज्यातर्फे करण्यात आला आहे. यापैकी तीन कोटी वृक्षलागवड वनक्षेत्रात केली जाणार आहे. वनक्षेत्र मर्यादित असल्याने एक कोटी वृक्षलागवड शासकीय, निमशासकीय, खासगी जागेवर करण्याचे प्रयोजन आहे. याकरिता सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. 

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या टाळा
विकत मिळणारे बाटलीबंद पाणी शुद्धच असते असा सर्वांचा समज आहे. मात्र, ते शंभर टक्के  खरे नाही. बाटलीसाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे प्लास्टिकचे  प्रदूषण वाढत आहे. वनकार्यालयांमध्ये शुद्ध व थंड पाण्याच्या मशीन उपलब्ध असल्याने आपण बाटलीबंद पाणी बंद केले. सुरुवातीला यास विरोध झाला. मात्र, सर्वांची समजूत घातली. विकत मिळणारे पाणी अशुद्धसुद्धा असते हे पटवून दिले. यानंतर ते सर्वांनी मान्य केले आणि बाटलीबंद पाण्याचा वापर बंद केला. सोलर कुकर, प्लास्टिकच्या पत्रावळीऐवजी पानांच्या पत्रावळी वापरण्याचाही सल्ला एस. एच. पाटील यांनी यावेळी सर्वांना दिला.

आम्ही सुरुवात केली
स्वागतासाठी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा चांगलीच रूढ झाली आहे. ती खर्चिक आहे, याकरिता मोठ्या प्रमाणात फुले आणि वृक्षांची कटाई केली जाते. त्यावर प्लास्टिकचा पेपर गुंडाळला जातो. याशिवाय पुष्पगुच्छांचे आयुष्य काही तासाचेच असते. त्यानंतर प्लास्टिकसह तो कचऱ्यात  फेकला जातो. याकरिता आम्ही वनविभागात कार्यक्रमांमधून पुष्पगुच्छांवर बंदी घातली आहे. त्याऐवजी पुस्तक देऊन स्वागत केले जाते. ही प्रथा आमच्या कार्यालयांमध्ये चांगलीच रूढ झाली आहे.