राज्यभरात पेपर रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नागपूर - उमेदवारांच्या तीव्र रोषानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने रविवारी झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी केंद्रावरील पेपर ऐनवेळी रद्द केला. पेपरफुटीसह संपूर्ण प्रक्रियाच ‘सेट’ असल्याची शंका व्यक्त करीत विविध भागातील उमेदवारांनी राज्यभरातील पेपर  रद्द करून ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. 

नागपूर - उमेदवारांच्या तीव्र रोषानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने रविवारी झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी केंद्रावरील पेपर ऐनवेळी रद्द केला. पेपरफुटीसह संपूर्ण प्रक्रियाच ‘सेट’ असल्याची शंका व्यक्त करीत विविध भागातील उमेदवारांनी राज्यभरातील पेपर  रद्द करून ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील १४ हजार २४७ आणि नागपूर विभागातील २०२ पदांसाठी भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. रविवारी शहरातील चार केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी येथे २१ खोल्यांमध्ये १ हजार २०० परीक्षार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली. उमेदवारांनी व्यवस्थेवर तीव्र आक्षेप आणि पेपरफुटीची शंका व्यक्त करीत परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. 

पेपर सोडविणाऱ्या उमेदवारांचे पेपर  हिसकावले, खुर्च्या भिरकावल्या. बाकांवर रीतसर क्रमांक नव्हते, उमेदवारांना सोईने बसण्याची मुभा होती. पेपर आणि उत्तरपत्रिकेचे पाकीट सीलबंद नव्हते, सुरक्षा तोकडी होती, इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे हाताळण्याची मुभा दिल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला. काहींनी प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र मोबाईलवरून व्हायरल केल्याचेही सांगितले. उमेदवारांचा वाढता रोष लक्षात घेऊन या केंद्रावरील पेपर रद्द करण्यात आला. नव्याने पेपर घेण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेऊन संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. परीक्षा आटोपताच जरीपटका केंद्रावरील विद्यार्थ्यांनी संविधान चौकात निदर्शने करीत पेपर नव्याने घेण्याची मागणी केली. हे लोण आज विविध भागांत पसरले. क्रांतिसूर्य युवा संघटना आणि युवक काँग्रेसचे आनंद तिवारी, अभिषेक सिंग, अमित सिंग, अमीर मुरी, इशांत चव्हाण, सूरज वरभने, रीतेश मानवटकर, प्रदीप धनविजय, लक्ष्मीकांत मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर येथील उमेदवारांनीही पेपर रद्द करून नव्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली. एसटी महामंडळाचे प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.