बैलासाठी शेतकरी झुंजला बिबट्याशी

विनोद पिल्लेवान 
सोमवार, 15 जानेवारी 2018

उमरेड - हिंस्र प्राणी समोर बघून कुणाचीही बोबडी वळेल. पण, बैलाला वाचविण्यासाठी लोहारा येथील रवींद्र ठाकरे चक्क बिबट्याशी झुंजले. ठाकरे यांच्या मदतीला आलेल्या गावकऱ्यांनी कुऱ्हाडीने वार केल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असून झटापटीत आणखी एक शेतकरी जखमी झाला. बिबट्याने हल्ला केलेले ठाकरे यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

उमरेड - हिंस्र प्राणी समोर बघून कुणाचीही बोबडी वळेल. पण, बैलाला वाचविण्यासाठी लोहारा येथील रवींद्र ठाकरे चक्क बिबट्याशी झुंजले. ठाकरे यांच्या मदतीला आलेल्या गावकऱ्यांनी कुऱ्हाडीने वार केल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असून झटापटीत आणखी एक शेतकरी जखमी झाला. बिबट्याने हल्ला केलेले ठाकरे यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

लोहारा गावाने रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा थरार अनुभवला. बिबट्याच्या तावडीतून बैलाला सोडविण्यासाठी रवींद्र ठाकरे यांनी त्याला दगड फेकून मारला. यामुळे चवताळलेल्या तीन वर्षांच्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर गावकरी त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी बिबट्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात बिबट्या ठार झाला. तर झटापटीत एक शेतकरी जखमी झाला. त्यांच्या हातावर, पाठीवर तसेच अन्य ठिकाणी जखमा झाल्या. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे कळते.

लोहारा येथील वनविभागाच्या नर्सरीजवळ रवींद्र ठाकरे (वय ४७) यांचे शेत आहे. सकाळी बैल बांधायला गोठ्यात गेले असता लपून बसलेल्या बिबट्याने बैलावर हल्ला केला. ठाकरे यांनी बैलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची बिबट्याशी पाच मिनिटे झटापट झाली. यात बिबट्या व ठाकरे दोघेही जखमी झाले. बिबट्या गोठ्यातून पळाल्यानंतर रवींद्र शेतातील मचाणावर लपून बसले. पंधरा मिनिटांनी ठाकरे बैलांकडे आले असता बिबट्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. बाजूच्या शेतातून राजेंद्र ठाकरे (वय ४५) धावून आले. बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला केला. यात ते जखमी झाले. मदतीसाठी आलेले विजय जाधव व साजीद टालेकर बिबट्याचा रौद्रावतार बघून झाडावर चढले. बिबट्या आणि गावकरी असा संघर्ष दहा-बारा मिनिटे सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याने आपल्या बचावासाठी बिबट्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात बिबट्या ठार झाला. घटनेनंतर मानद वन्यजीवरक्षक रोहित कारू, पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील जयस्वाल, पोलिस निरीक्षक प्रकाश हाके घटनास्थळी पोहोचले. नागपूरचे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी बी. एम. कडू, मकरधोकडा येथील डॉ. पी. एन. काळे, डॉ. व्ही. डी. गवखरे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.

‘गुन्हा दाखल करू नका’
बैलाला तसेच स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात बिबट्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वनविभागाने माझ्या पतीवर गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी जखमी रवींद्रच्या पत्नीने केली आहे. रवींद्र यांच्या पत्नी एका पायाने अधू आहेत. 

लोहारा परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. जीव वाचविण्यासाठी त्यांनी बिबट्यावर हल्ला केला असेल, तर वनविभागाकडून जखमींना मदत केली जाईल. 
-मंगेश ठेंगडी, सहायक वनसंरक्षक 

Web Title: nagpur news farmer leopard