वन्यजीव व जैवविविधता संवर्धनावर भर

राजेश रामपूरकर
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नागपूर - राज्यातील अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव आणि वन संवर्धनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष व्याघ्र संवर्धन दल, संशोधन प्रकल्प, कुरण विकास कार्यक्रम यांच्यासह 508 गावांमध्ये डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजना राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संरक्षित जंगलांमध्ये संरक्षण कुटी उभारल्याने वन्यजीवांचे संरक्षण होत असून, शिकारीवर वचक बसला आहे.

जंगलात वाघ असणे समृद्ध जंगलाचे प्रतीक आहे. तो जंगलातील अन्नसाखळीमधील मुख्य घटक आहे. वाघामुळे जंगलातील वनस्पतींचे इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त, ते जंगल किंवा तेथील भाग परिपूर्ण मानला जातो. वनसंपदेमुळे प्राणीमात्रांसाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन, मुबलक पाणी आणि जमिनीची धूप थांबविण्यासह मदत होते. हे लक्षात घेऊन वन्यप्राण्यांची शिकार आणि जंगलातील अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना जंगलात राहण्यासाठी संरक्षण कुटी बनवल्या आहेत.

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच आणि नवेगाव नागझिरा या चार व्याघ्र प्रकल्पांमध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापले आहे. विदर्भातील वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गाचा भारतीय वन्यजीव संस्थेने अभ्यास केला आणि भ्रमणमार्ग निश्‍चित केले आहेत. त्यादृष्टीने वन्यजीवांचा भ्रमणमार्ग खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली जाते. गवती कुरण विकास कार्यक्रम राबवून पाणवठेही तयार केले आहेत. त्यासाठी जिल्हा विकास निधीतून पैसा उपलब्ध झाला आहे.

भरपाईमध्ये वाढ
वन्यप्राण्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला करून ठार मारणे अथवा जखमी केल्यास संबंधिताला तसेच हल्ला केल्यामुळे कोणी व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या परिवाराला देण्यात येणारी भरपाईही वाढविली आहे. वाघांसह माळढोक, सारस, शेकरू यांचा मागोवा घेण्यासाठी पाच आघाडीच्या संस्थांच्या संशोधकांच्या माध्यमातून सूक्ष्म अभ्यास करण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्यही आहे. त्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जैवविविधता मंडळाची स्थापना केली आहे.

वन व वन्यजीव संवर्धनासाठी राज्य सरकारकडून प्रभावी योजना राबविण्यात येत आहेत. संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमधील ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होऊन जन वन विकास साधण्यासाठी सरकारने डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू केली आहे.
- गिरीश वशिष्ठ, विभागीय वनाधिकारी

आकडे बोलतात (राज्याची स्थिती)
वन्यजीव अभयारण्य - 48
संवर्धन राखीव -6
व्याघ्र प्रकल्प - 6

वाघांची संख्या - राज्यात 203 - विदर्भात 199
बछड्यांची संख्या राज्यात 100 - विदर्भात - 97

संरक्षित क्षेत्रालगतच्या ग्रामस्थांचे वनावरील अवलंबत्व कमी कण्यासाठी बांबू मिशन, गॅस आणि दुधाळी जनावरांचे वाटप केले जाते. यामुळे ग्रामीण जनतेचे जंगलावरील अवलंबत्व कमी झाले आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष घटण्यास मदत झाली आहे. ते सहजीवनाचे उत्तम उदाहरण आहे.
- सुभाष डोंगरे माहिती व प्रसिद्धी अधिकारी (वने)